छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य रॅली पार पडली. सामाजिक समता शिवा पुरस्कार वितरणाबाबत मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली.
छत्रपती संभाजीनगर : येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या द्विपंधरवड्याची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. जालना रोडवरील महात्मा बसवेश्वर चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवा संघटनेच्यावतीने भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड तसेच प्रा. मनोहर धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले.
या जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धर्मात्मा प्रा. मनोहर धोंडे यांनी भूषवले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय केणेकर, बसवराज मंगरुळे, अभयराव कल्लावार, राजू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित शेकडो शिवा मावळ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. मनोहर धोंडे यांनी बसवकल्याण येथील महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटप व पुरसू कट्टा मुक्त करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तसेच महात्मा बसवेश्वर यांची जयंती केंद्र सरकारने देशभरातील कार्यालयांमध्ये अधिकृतरीत्या साजरी करावी, अशी मागणी केली.
याच वेळी त्यांनी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार जाहीर होऊनही वितरण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात प्रदान करण्यात यावेत, अशी मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत मंत्री अतुल सावे यांनी उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सामाजिक समता शिवा पुरस्कारांचे वितरण छत्रपती संभाजीनगर येथेच करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा केली.
भव्य मोटरसायकल रॅलीदरम्यान ‘जय शिवा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शेकडो युवकांनी मोटरसायकलींसह सहभाग नोंदवत या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीचा समारोप शिवा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून साकार होत असलेल्या आणि सध्या अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारक येथे झाला.
या प्रसंगी शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार, जिल्हाध्यक्ष अशोकराव बसापुरे, अशोक फुलशंकर, बंडू पटणे, शिवदास तोडकर, ओंकार सोनटक्के, गोविंद सोलपुरे, अंकुश लेंडाळे, गणेश डोणगावकर, अमोल साखरे, अनिल घोडेकर, चंद्रकांत सुतार, वीरभद्र वनशेट्टी, उमेश दारुवाले, विशाल शेटे, उत्तमराव चिकाळे, रविंद्र रेडे, सच्चिदानंद कन्नाडे, प्रभू साखरे यांच्यासह शेकडो शिवा मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
--------------------------



