म्हाडा मुंबई मंडळाच्या २६४० सदनिकांच्या सोडतीसाठी अर्जाची मुदत १४ मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून ५ जून रोजी संगणकीय सोडत होणार आहे.
मुंबई : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या २६४० सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व अनामत रक्कम भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांना आता १४ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार असून १५ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तसेच १५ मे रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारेही रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
मंडळाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २२ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता प्राप्त अर्जांची प्रारूप यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर २५ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर २९ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाईल. या सर्व प्रक्रियेनंतर ५ जून २०२६ रोजी संगणकीय सोडत जाहीर होणार असून सोडतीचे स्थळ लवकरच घोषित करण्यात येणार आहे.
मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये या सोडतीचा समावेश असून कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा या भागांतील सदनिकांचा समावेश आहे.
या २६४० सदनिकांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका उपलब्ध आहेत. यामध्ये काही सदनिका म्हाडाच्या बांधकामाधीन प्रकल्पांमधील आहेत तर काही पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विकासकांकडून मिळालेल्या गृहनिर्माण साठ्यातील आहेत. याशिवाय मागील सोडतींमध्ये रिक्त राहिलेल्या सदनिकांचाही या सोडतीत समावेश करण्यात आला आहे.
सर्व अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून अर्ज नोंदणीपासून कागदपत्र पडताळणी, अनामत रक्कम भरणा आणि पुढील व्यवहारही डिजिटल पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ही प्रणाली पारदर्शक, फेसलेस आणि मानवी हस्तक्षेपविरहित असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
अर्जदारांनी केवळ अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत मोबाईल अॅपद्वारेच अर्ज करावा आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा दलालांशी आर्थिक व्यवहार टाळावेत, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. फसवणुकीच्या घटना आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
____
