सरकारचं टेन्शन वाढलं, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
नागपूर : राज्य सरकारसाठी चिंता वाढवणारी राजकीय घडामोड समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या या आंदोलनामुळे आधीच सरकारवर दबाव निर्माण झाला आहे, आणि आता जरांगे पाटील यांच्या सहभागामुळे हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे अजित नवले, रविकांत तुपकर, यांसह अनेक संघटनांचा सक्रिय पाठिंबा मिळाला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी चार महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांसह प्रशासनालाही मोठा त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर बच्चू कडू स्वतःहून पोलिस ठाण्याकडे अटक होण्यासाठी पायी निघाले. त्यांच्या मागे हजारो आंदोलकांनीही पोलिस ठाण्याच्या दिशेने मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा नागपुरात मोठ्या राजकीय हालचाली झाल्या. राज्य सरकारकडून मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिया जयस्वाल यांच्या शिष्टमंडळाने नागपूरच्या खापरी परिसरात बच्चू कडू आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. जवळपास तासभर चाललेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
सरकारच्या मंत्र्यांनी चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून बच्चू कडू यांच्या प्रतिनिधी मंडळाला उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. यानंतरही बच्चू कडूंनी स्पष्ट केले की, “आंदोलन रात्रभर सुरू राहील. आम्ही संवाद साधायला तयार आहोत, पण तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रशासनाकडून कोणताही त्रास होऊ नये.”
दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील देखील आज रात्री उशिरा नागपूरकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी म्हटलं, “शेतकरी वर्ग नागपूरमध्ये अटीतटीच्या स्थितीत बसला आहे. अशा वेळी आपण त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहायला हवं. त्यांच्या मागण्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, म्हणून आम्ही तातडीने निघालो आहोत.”
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत गुरुवारी महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्या एकत्र येण्याने या आंदोलनाला नवं बळ मिळालं असून, सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
