बच्चू कडू म्हणतात – “लोकन्यायालयाचंही ऐकणार...”
नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनावर आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने कारवाई केली आहे. खंडपीठाने बच्चू कडू आणि आंदोलनकर्त्यांना आंदोलन स्थळावरून बाजूला व्हावे, असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाची सुमोटो दखल घेतली असून, नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय दिला आहे.
बच्चू कडू यांनी 28 ऑक्टोबर रोजी परसोडी गावाजवळील मैदानावर कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनाची परवानगी फक्त 28 तारखेसाठी देण्यात आली होती. मात्र, 29 तारखेलाही आंदोलन सुरू असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आणि जवळच्या रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना ठिय्या आंदोलन सुरू असलेली जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर पोलिस आयुक्तांनी आदेशाची पूर्तता झाल्याचा अहवाल उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत न्यायालयात सादर करावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही. मात्र, जर लोक आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेत असतील, तर आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू. आता हा संघर्ष लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातला आहे. आम्ही लोक न्यायालयाचे ऐकणे सोडणार नाही.”
कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस अधिकारी, ज्यामध्ये स्पेशल ब्रॅंचचे डीसीपी सातव यांचा समावेश होता, त्यांनी बच्चू कडू यांना भेटून आदेशाची प्रत दाखवली. या वेळी बच्चू कडू संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांना उद्देशून म्हटलं, “साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दांची औलाद आहात. जेल कमी पडेल, अटक करा, आता रामगिरी ताब्यात घेऊ.”
बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखत असतानाच लोकांच्या न्यायालयालाही मान देणार असल्याचे सांगितले आहे. आता बच्चू कडू काय निर्णय घेतात आणि पोलिस कारवाई कशी होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.