अंधारेंची हादरवाणी माहिती; रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप
मुंबई : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दररोज नवनवे खुलासे होत असताना, आता या प्रकरणावरून राजकीय वाद अधिक चिघळला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर थेट हल्ला चढवला, तसेच या प्रकरणातील तपासात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप केला.
पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की “मृत डॉक्टर तरुणीच्या हातावर आणि तिच्या सुसाईड नोटमधील वेलांटीत स्पष्ट फरक आहे. पत्रात ‘पोलीस निरीक्षक’ हा शब्द नऊ वेळा आला आहे, पण त्या शब्दातील वेलांटी आणि हातावरील वेलांटी दोन्ही भिन्न आहेत. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या, याबाबत शंका घेण्यास वाव आहे.”
अंधारे यांनी सांगितले की, त्यांनी हस्ताक्षराचा अहवाल मागवला आहे आणि तो दोन दिवसांत मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.
अंधारेंनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. त्या म्हणाल्या “महिला आयोगाने कोणत्या अधिकाराखाली या प्रकरणात सार्वजनिकरित्या वक्तव्य केलं? सीडीआर (Call Detail Record) सार्वजनिक करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? राष्ट्रीय महिला आयोगाने या व्यक्तीला पदावर ठेवावं की नाही, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.”
अंधारे यांनी या कृतीला “भाजप प्रायोजित पत्रकार परिषद” असे संबोधले आणि चाकणकरांवर राजकीय प्रेरणेने वागल्याचा आरोप केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की “पोलिस सांगतात की, आत्महत्या संध्याकाळी सात वाजता झाली, पण त्या महिलेने रात्री अकरा वाजता व्हॉट्सॲप स्टेटस लाईक केलं. मग हा वेळेचा फरक कसा? त्यामुळे आमचा संशय पोलिसांवर आहे.”त्यांनी उच्च न्यायालयाने या प्रकरणात “उच्चस्तरीय समिती नेमावी” अशी मागणी केली आहे.
अंधारे यांच्यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ५० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या नोटीसीबाबत अंधारे म्हणाल्या “ही नोटीस मी सहर्ष स्वीकारते. मला कुणी घाबरवू शकत नाही. नोटीसला उत्तर देण्यासाठी मी कायदेशीर मार्गाने पुढे जाणार आहे.”
त्यांनी स्पष्ट केलं की, घटनास्थळावरील मुद्देमाल गोपनीय ठेवण्याचा नियम पोलिसांनी मोडला आहे, त्यामुळे यावर कारवाई व्हायला हवी.
सुषमा अंधारे म्हणाल्या “मुख्यमंत्री न्यायाधीशांच्या खुर्चीत बसू नयेत. जर मुख्यमंत्रीच न्यायाधीशाची भूमिका घेणार असतील, तर मग न्यायालयाची गरज काय आहे?”त्या पुढे म्हणाल्या, “या प्रकरणात कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी हा मुद्दा न्यायालयीन मार्गाने नेईन.”
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची मागणी केली असून, महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
