जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, उद्देश आणि महत्त्व
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 31 ऑक्टोबरला जागतिक बचत दिन (World Savings Day) साजरा केला जात आहे. लहानपणी आई-वडिलांनी शिकवलेली “एक एक रुपया साठवला तर तोच भविष्यात मोठा आधार ठरतो” ही शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे.
या दिवसाचा उद्देश फक्त पैसे साठवणं नव्हे, तर जबाबदार आर्थिक नियोजनाची जाणीव निर्माण करणं आहे.
जागतिक बचत दिनाची सुरुवात 1924 साली इटलीतील मिलान शहरात झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बचत काँग्रेसपासून (International Savings Congress) झाली. त्या वेळी एका इटालियन प्राध्यापकाने 31 ऑक्टोबर हा दिवस “World Thrift Day” म्हणून घोषित केला.
पहिल्या महायुद्धानंतर लोकांचा बँकांवरील विश्वास कमी झाला होता, त्यामुळे लोकांना पुन्हा बचतीचं आणि बँकिंगचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली.
या दिवसाचं मुख्य ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकामध्ये बचतीची सवय निर्माण करणे,
भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावणे लोकांना बँकिंग आणि गुंतवणुकीच्या सवयी.मध्ये प्रोत्साहन देणे. दुसऱ्या महायुद्धानंतर या उपक्रमाला अधिक गती मिळाली आणि हळूहळू जगभरातील देशांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.
2025 सालच्या जागतिक बचत दिनाची थीम आहे – “बचत तयारी भविष्यासाठी” (Saving Preparation: You for the Future). ही थीम गेल्या वर्षीच्या “Saving prepares you for the future” या संकल्पनेशी जोडलेली आहे. यावर्षी विशेष भर दिला जात आहे की —
“बचत ही फक्त आजची गरज नाही, तर उद्याच्या संकटांपासून वाचवणारे कवच आहे.”
या निमित्ताने बँका, शाळा, वित्तसंस्था आणि सरकारी विभाग विविध मोहिमा राबवत आहेत बचतीबाबत जनजागृती मोहीमा, आर्थिक साक्षरतेसाठी कार्यशाळा, बचत प्रोत्साहन योजना याचा यात समावेश आहे.
बचत ही फक्त पैशांपुरती मर्यादित नसून ती शिस्त, संयम आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. आजच्या काळात वाढती महागाई, बदलत्या नोकऱ्या आणि अनिश्चित अर्थव्यवस्था पाहता बचत करणे हे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक बनले आहे.
