एकनाथ खडसेंच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी आता नवा धक्कादायक तपशील समोर आला आहे. खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितले की, चोरट्यांनी त्यांच्या घरातील सीडी, पेनड्राईव्ह आणि महत्त्वाची कागदपत्रं लंपास केली आहेत.
या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, खडसे यांनी यामागे काहीतरी “विशेष हेतू” असावा, असा संशय व्यक्त केला आहे. खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील घरात 27 ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती. सुरुवातीला चोरट्यांनी सहा ते सात तोळे सोने आणि अंदाजे 35 हजार रुपयांची रोकड चोरल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र, आता खडसे यांनी दावा केला आहे की, त्यांच्या घरातील काही सीडी, पेनड्राईव्ह आणि भ्रष्टाचारविषयक कागदपत्रंही चोरीला गेली आहेत.
एकनाथ खडसे म्हणाले, “या चोरीत केवळ रोकड किंवा दागिने नाही, तर काही अतिशय महत्त्वाचे कागदपत्रं, पेनड्राईव्ह आणि सीडी गायब झाल्या आहेत. ही कागदपत्रं मी माहिती अधिकारातून मागवलेली होती. त्या सीडींमध्येही काही संवेदनशील माहिती होती. चोरट्यांनी नेमका तोच माल चोरला, यामागे नेमका उद्देश काय होता, याचा तपास व्हायला हवा.”
खडसे यांनी हेही सांगितले की, चोरीच्या वेळी घरातील लाईट बंद करण्यात आले होते, आणि ही बाब संशयास्पद असल्याने पोलिसांनी सखोल तपास करावा. ते पुढे म्हणाले, “आपल्या घरात नेमकं काय कुठे ठेवलेलं आहे हे माहित नसताना कोणी एवढं अचूक चोरी करू शकत नाही. त्यामुळे यामागे काही वेगळं कारण असावं, असं मला वाटतं.”
राजकीय वर्तुळात चर्चा अशीही आहे की, खडसे ज्या “सीडी”ची धमकी यापूर्वी वेळोवेळी देत होते, तीच सीडी आता गायब झाली आहे का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या चोरीच्या प्रकरणाला केवळ गुन्हेगारी नव्हे, तर राजकीय रंगही चढला आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या चोरीचा तपास सुरू असून, राजकीय नेत्याच्या घरातील चोरी असल्याने पोलीस दल हे प्रकरण प्रतिष्ठेचं मानून गुन्हेगारांचा शोध घेत आहे.
---
