शेतकरी एल्गारात मनोज जरांगे यांची सरकारवर टीका

  


 “शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर डाव बंद करावा!”

नागपूर : सातबारा कोरा आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी एल्गार आंदोलनाला आज नवा वेग मिळाला. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलनस्थळी पोहोचून सरकारवर जोरदार प्रहार केला.

जरांगे यांनी आपले भाषण शेतकऱ्यांच्या भावनांशी जोडून केले. “मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळे या लढ्यात मी स्वतःला सहभागी समजतो,” असे सांगत त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आणि एकतेचे आवाहन केले. मात्र सरकारविरोधी सूर मात्र अधिक तीव्र होता. “सरकारने डाव टाकला आहे, पण हा डाव आम्हालाच उलटवावा लागेल. सरकारचा डाव प्रतिडावानेच मोडता येतो,” असे ते म्हणाले.

सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी सवाल केला की, “बच्चू कडू यांना मुंबईला बोलावण्याची काय गरज? सरकारला नागपूरला यायला कोणता रोग आहे? पाय मोडलेत का? की डिझेल-रॉकेल लागते?” या विधानावर आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जरांगे यांनी सांगितले, “सरकारला घोडे लावल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही. सातबारा कोरा हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी एकजूट ठेवा आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटू नका.”

या आंदोलनामुळे नागपूर शहरात वाहतूक ठप्प झाली असून राज्य सरकारने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र शेतकरी संघटनांनी आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.















Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने