पोलिसांची तत्पर कारवाई, जीव वाचले पण प्रश्न कायम !
मुंबई: पवईत 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं. यावेळी छातीत गोळी लागल्याने रोहित आर्य गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या थरारक घटनेने मुंबई आणि राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुंबईतील पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये 17 लहान मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. या मुलांना "चित्रपटात काम देतो" असं सांगून बोलावण्यात आलं होतं. या मुलांमध्ये 15 वर्षांखालील शाळकरी मुले आणि दोन पालकांचा समावेश होता. ऑडिशनच्या नावाखाली आत बोलावून आरोपीने दरवाजे बंद केले आणि मुलांना ओलीस ठेवले.
मुलांच्या हालचाली थांबल्यानंतर पालकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पवई पोलीस, अग्निशमन दल आणि NSG कमांडोनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे चार तासांच्या ऑपरेशननंतर मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच रोहित आर्यने बंदुकीतून गोळीबार केला. पवई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. या गोळीबारात रोहित आर्यच्या छातीत गोळी लागली. लगेच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तो मरण पावला.
रोहित आर्य हा शिक्षण विभागाच्या “स्वच्छता मॉनिटर” प्रकल्पाशी संबंधित ठेकेदार होता. या प्रकल्पासाठी त्याने कर्ज काढून काम केलं, परंतु 45 लाख रुपये विभागाने दिले नाहीत, असा त्याचा आरोप होता. त्यामुळे 1 मेपासून तो आझाद मैदानावर उपोषणाला बसला होता. मानसिक ताण वाढल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याने व्हिडिओद्वारे “मी दहशतवादी नाही. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. संवाद साधायचा आहे. माझी पैशाची मागणी नाही, पण अन्यायाविरोधात बोलायचं आहे. समजून घेतलं नाही, तर जय श्री राम!” अशा आशयाचे वक्तव्य जारी केले होते.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने खोलीच्या खिडक्यांवर सेन्सर बसवले होते, जेणेकरून कोणी आत शिरू नये. शेवटी, पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून सर्व मुलांची सुरक्षित सुटका केली. आत एकूण 19 लोक होते 17 मुले, एक स्थानिक आणि एक पालक.
सर्व मुलं सुरक्षित असून त्यांची पालकांसमवेत चौकशी पूर्ण झाली आहे. मात्र, हा प्रकार पाहून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींची चौकशी सुरू केली आहे.
स्वप्नांचा शहर असलेल्या मुंबईत बालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली. पवईतील आरए स्टुडिओमध्ये तब्बल १७ चिमुकल्यांना बंदिस्त करून ठेवण्याचा प्रकार उघड झाला. “चित्रपटात काम देतो” या आमिषाला बळी पडून वसई, वाशी, पनवेल अशा भागांतून आलेल्या मुलांना स्टुडिओत डांबून ठेवण्यात आले होते. पण पोलिसांच्या जलद कारवाईने सर्व मुलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने “ऑडिशन”च्या नावाखाली या मुलांना स्टुडिओत बोलावले. सहा दिवसांपासून शूटिंग सुरू होतं. दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत ही मुलं आत असायची. पण मुलांना जेवणासाठीही बाहेर सोडण्यात आलं नाही.
याच वेळी काही पालकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना संपर्क साधला.
पवई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरए स्टुडिओमध्ये छापा टाकला. आत काचेमधून मुलं हात हलवून पालकांना मदतीसाठी हाक मारताना दिसली. स्टुडिओ पूर्णतः पॅक होता, त्यामुळे बाहेरून काहीच दिसत नव्हतं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढलं
---
