महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा कहर; ४५ अंशांपर्यंत तापमानामुळे नागरिक हैराण !

 

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट कायम असून दहा दिवसांत १५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले.

मुंबई : राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रचंड तडाखा कायम असून तापमानात होत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली असून उपराजधानी नागपुरात गेल्या दहा दिवसांत उष्माघातामुळे १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूंना संशयित उष्माघात कारणीभूत असल्याचे सांगितले जात असून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. अकोला आणि अमरावती येथे सर्वाधिक ४५.२ अंश तापमानाची नोंद झाली, तर वर्ध्यात ४५ अंश आणि नागपुरात ४४.४ अंश सेल्सिअस तापमान राहिले. गेल्या २४ तासांत काही भागात तापमानात किंचित घट झाली असली तरी उष्णतेचा तडाखा कायम असल्याचे चित्र आहे.

मुंबईसह राज्यातील शहरी भागातही उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून थकवा, अशक्तपणा, मळमळ, उलटी, डोळ्यांची जळजळ, भूक मंदावणे आणि झोपेच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. काही प्रकरणांमध्ये उष्माघातामुळे चक्कर येणे, तोल जाणे, शरीराचे तापमान अचानक वाढणे आणि शुद्ध हरपणे यांसारखी गंभीर लक्षणेही आढळत आहेत.

तज्ञांच्या मते, उष्णतेमुळे त्वचेवर लालसरपणा, खाज, पुरळ आणि फोड येण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः ज्या भागात जास्त घाम येतो त्या ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे स्वच्छता आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.

उष्णतेपासून बचावासाठी हलक्या रंगाचे आणि सैल सुती कपडे परिधान करणे, बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करणे, तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शरीरातील पाणी आणि क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित पाणी पिण्यासोबत ओआरएसचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात येत आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांनी औषधे वेळेवर घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. भूक नसल्यामुळे औषधे टाळल्यास लक्षणे अधिक गंभीर होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे.

°°°°°



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने