रोज 20 रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास होऊ शकता करोडपती
प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचा निधी असावा आणि त्याच्या आयुष्यात आर्थिक ताण नसावा. हे स्वप्न अशक्य नसले तरी बहुतांश लोकांना ते साध्य करणे अवघड वाटते. परंतु श्रीमंत होण्यासाठी मोठी कमाई किंवा मोठा वारसा लागत नाही, तर लहान रकमेची योग्य गुंतवणूक पुरेशी ठरू शकते. आश्चर्य वाटेल पण फक्त रोजच्या दोन चहा सोडल्यानेही कोटी रुपये जमा करता येऊ शकतात. या छोट्या बदलामुळे तब्बल दोन फायदे होतात चहा कमी घेतल्याने शरीराला फायदा आणि वाचवलेला पैसा गुंतवणूक केल्यास आर्थिक आरोग्य सुधारणार.
सामान्यतः बहुतेक लोक दिवसातून किमान दोनदा चहा पितात आणि एका चहाची किंमत सुमारे 10 रुपये पडते. म्हणजे दोन चहांवर 20 रुपये खर्च होतात. हे 20 रुपये रोज वाचवले तर महिन्याला 600 रुपये बचत होते. रक्कम कमी वाटू शकते, पण हाच पैसा योग्य ठिकाणी नियमित गुंतवला तर तो भविष्यात मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकतो. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते म्युच्युअल फंडातील SIP म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा छोट्या रकमेची दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंड दीर्घकाळात सरासरी 15% ते 20% पर्यंत परतावा देण्याची क्षमता ठेवतात.
समजा, एखाद्या व्यक्तीने 20 व्या वर्षापासून रोज दोन चहा सोडून दररोज 20 रुपये वाचवायला सुरुवात केली आणि त्याच रकमेची म्हणजे महिन्याला 600 रुपयांची SIP सुरू केली. 40 वर्षे म्हणजे 480 महिने गुंतवणूक केल्यास प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 2,88,000 रुपये होते. SIP कॅल्क्युलेटरनुसार या कालावधीत सरासरी 15% परतावा मिळाल्यास ही रक्कम वाढून तब्बल 1,38,28,002 रुपये होते, म्हणजे साध्या बचतीतून करोडपती बनणे शक्य आहे. आणि जर सरासरी 20% परतावा मिळाला तर हीच रक्कम तब्बल 5,84,44,517 रुपयांपर्यंत जाऊ शकते म्हणजे तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी.
SIP मधील कंपाउंडिंगची ताकद या संपूर्ण गणिताच्या मुळाशी आहे. कंपाउंडिंग म्हणजे मुख्य गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर देखील व्याज मिळणे आणि कालांतराने निधी वेगाने वाढत जाणे. म्हणूनच जितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली जाते तितका फायदा मिळतो. आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी मोठी रक्कम नाही, तर सातत्य, संयम आणि शिस्तबद्ध गुंतवणूक सर्वात महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार छोटी SIP सुरू करून दीर्घकाळ गुंतवणूक सुरू ठेवली तर करोडपती बनणे अवघड नाही.
[सूचना: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.]
---------------------------------------------
