नांदेड : शहरात प्रेमसंबंधांना जातीयतेच्या विचारांनी गिळंकृत केले आणि एका तरुणाचा जीव घेतला. गुरुवारी संध्याकाळी जुना गंज भागात सक्षम ताटे या तरुणाची त्याच्या प्रेयसी आंचल मामीलवाडच्या घरच्यांनी निर्घृण हत्या केली. सक्षम आणि आंचल यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र सक्षम वेगळ्या जातीचा असल्याने या नात्याला मुलीच्या कुटुंबाकडून विरोध होता. सक्षमला मुलीच्या नात्यातून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला होता, पण दोघेही एकमेकांपासून दूर गेले नाहीत. या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर आणि सक्षम जेलमधून सोडून आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्या खूनाचा कट रचल्याचा आरोप आंचलने केला आहे.
घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह सहकाऱ्यांनी सक्षमला बोलावून घेतले आणि थेट गोळ्या झाडल्या. त्यानंतर फरशी घालून डोक्यावर वार करत त्याला ठार मारण्यात आले. गजानन मामीलवाड, साहील मामीलवाड यांच्यासह एकूण पाच जणांनी हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामीलवाड, साहील ठाकूर, सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत. या भयानक घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली असून समाजातील जातीय विद्वेषावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, सक्षम ताटे याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांनी कल्पनाही केली नसावी, अशी हृदयद्रावक घटना घडली. प्रेयसी आंचल मामीलवाड सक्षमच्या घरी पोहोचली आणि त्याच्या मृतदेहाशी लग्नाचा विधी पूर्ण केला. तिच्या अंगाला हळद लावण्यात आली, कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू तिने स्वतः लावले आणि साऱ्यांसमोर मृतदेहासमोर विवाहाच्या प्रतीकात्मक विधी केल्या. सक्षमच्या मृतदेहावरही हळद लावण्यात आली. हा प्रसंग पाहून उपस्थित दोन्ही कुटुंबीयांसह सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सक्षमचा मृतदेह घरात आणताच आंचलचा हंबरडा फुटला आणि तिने आपल्या प्रेमाचा शेवटचा हक्क समाजापुढे निडरपणे जगला.
माझे वडील आणि भाऊ हरले, मरूनही माझा प्रियकर जिंकला, असे ती भावनिक शब्दांत म्हणाली. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमचा खून केला, पण सक्षम मृत्यूनेही आमचे प्रेम हरले नाही. या घटनेबाबत कठोर भूमिका घेत आंचलने माझ्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली आहे. संपूर्ण प्रकरणामुळे नांदेड शहरात ताणतणावाचे वातावरण असून समाजात पुन्हा जातीयतेच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांवर चर्चा सुरू झाली आहे.
-------------------------------------------------
