स्वतःच्या हत्या प्रकरणात पतीला जेलमध्ये पाठवून 'ती' बॉयफ्रेंडसोबत मौजमजा करताना सापडली !

 


नवी दिल्ली : देशभराला हादरवणाऱ्या घटनाक्रमानुसार, हत्या झाल्याचे प्रमाणपत्र मिळवून पतीला कारागृहात पाठवण्यात आलेली २५ वर्षीय तरुणी चार महिन्यांनी जिवंत आढळल्याने संपूर्ण तपास व न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जुलै 2025 मध्ये संशयित हत्या,  हुंडा, अत्याचार आणि मृतदेह नष्ट केल्याचा आरोप तिच्या पतीवर ठेवण्यात आला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार ती मृत असल्याचे सांगण्यात आले आणि पोलिसांनी तक्रारीला आधार मानून आरोपपत्र दाखल केले. पतीला निर्दयी हत्यारा म्हणून समाजात ठपका ठेवून त्याला तुरुंगात डांबण्यात आले. 

मात्र २४ नोव्हेंबर 2025 रोजी तपासादरम्यान तांत्रिक शोध घेऊन पोलिसांनी त्याच महिलेला सुखरूप अवस्थेत तिच्या प्रेमीसोबत राहताना शोधून काढले. अधिक चौकशीत तिने स्वतः इच्छेने घर सोडल्याचे सांगितले. पतीवर लावलेले हत्या, हुंडा आणि अपहरणाचे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले असून तपासाला नवे वळण मिळाले आहे.

या प्रकरणामुळे फक्त एका कुटुंबाचा संसार उद्धवस्त झाला नाही, तर घाईत निष्कर्ष काढणाऱ्या तपासपद्धतीची उणीवदेखील मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. भावनिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर निर्दोष व्यक्तीला हत्यारा ठरवले जाणे ही न्यायव्यवस्थेतील अत्यंत धोकादायक त्रुटी असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

खोट्या आरोपांनी केवळ एका कुटुंबाचे भविष्य उद्ध्वस्त झाले नाही, तर खऱ्या पीडित महिलांसाठी न्याय मिळविण्याविषयी समाजातील विश्वासाला धक्का बसला आहे. आरोपी ठरवलेल्या पतीची सुटका आता तातडीने होण्याची शक्यता असून संबंधित महिलेवर आणि तिच्या प्रेमीवर खोटे आरोप करणे व तपास भरकटवणे याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेने संपूर्ण देशाला पुन्हा सांगितले आहे की, न्याय म्हणजे फक्त शिक्षा नव्हे तर निर्दोषाला वाचवणेही तितकेच आवश्यक आहे.

देशाची राजधानी दिल्लीलगतच्या नोएडामधून ही धक्कादायक बातमी समोर आली. ऐकणारा प्रत्येकजण थक्क होईल. या घटनेचा संबंध बिहारमधील मोतीहारी शहराशी आहे. मोतीहारीमध्ये पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली एक पती गेल्या चार महिन्यांपासून तुरुंगात आहे. परंतु जिच्या हत्येचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता तीच पत्नी प्रत्यक्षात मोतीहारीपासून तब्बल हजार किलोमीटर दूर नोएड्यात तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना जिवंत आढळली. विशेष म्हणजे या कथित खूनप्रकरणात मोतीहारी पोलिसांनी आधीच चार्जशीट दाखल केली होती आणि लवकरच खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. घटनेचा खुलासा झाल्यानंतर पतीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या महिलेवर कारवाई करत तिला ताब्यात घेतले आहे.


-----------------------------------------------------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने