छत्रपती संभाजीनगरात पूजाची पतीकडून हत्या; नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिल्याने पोलिसांनी पुढाकार घेत अंत्यविधी केले, धक्कादायक प्रकार समोर.
छत्रपती संभाजीनगर : शहरात घडलेल्या एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पूजा सुदाम गावंडे (वय २७) हिची तिच्याच दुसऱ्या पतीने निर्घृण हत्या केल्यानंतर, तिच्या अंत्यसंस्कारासाठी सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने अखेर पोलिसांनाच पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करावे लागले. ही अंत्यविधी प्रक्रिया बेगमपुरा स्मशानभूमी येथे पार पडली.
ही घटना करमाड परिसरातील एका पेट्रोल पंपावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ही काही दिवसांपासून करमाड येथे राहत होती आणि आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी पेट्रोल पंपावर नोकरी करत होती. घटनेच्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर हजर झाली होती. दुपारच्या सुमारास तिचा पती सत्यम दुचाकीवरून पंपावर आला आणि अचानक तिच्यावर हल्ला केला.
प्राथमिक माहितीनुसार, सत्यमने पूजाला पकडून तिच्या पाठीत चाकूने वार केले. त्यानंतर तिला जमिनीवर पाडत गळा चिरल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार अत्यंत क्रूरतेने घडला असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने चाकूचा धाक दाखवत तेथून पळ काढला.
ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सकाळीच आरोपी घटनास्थळी आला होता, मात्र गर्दी असल्याने तो परत गेला होता. दुपारी संधी साधून त्याने हा हल्ला केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी पूजाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पूजाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती अशी की, तिचे पहिले लग्न २०१७ मध्ये झाले होते. मात्र कौटुंबिक कारणांमुळे तिच्या पहिल्या पतीने २०२३ मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२५ रोजी तिने सत्यमसोबत दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर काही काळ दोघे एकत्र राहत होते, मात्र अलीकडे त्यांच्यात वाद वाढल्याने पूजा करमाड येथे स्वतंत्र राहत होती.
दरम्यान, या घटनेनंतर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पूजाच्या अंत्यसंस्कारासाठी तिच्या सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत तिच्या दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पूर्ण केले.
या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
°°°°°
