Sonali hinge : पुणे पोलीस दलात खळबळ; ‘रील स्टार’सह तिघे खंडणी प्रकरणात निलंबित!

 

पुण्यातील खंडणी प्रकरणात सोनाली हिंगेसह तीन पोलिसांचे निलंबन; प्राचार्यांना धमकावून लाखो रुपयांची उकळपट्टी केल्याचा आरोप, पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह.

पुणे : शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणाऱ्या खंडणी प्रकरणात ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत अजित बडे आणि सुदाम तायडे यांचाही समावेश असून, तिघांवर नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमकावून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन विद्यार्थिनीची कागदपत्रे अडकल्याच्या कारणावरून तिने पोलिसांकडे मदत मागितली होती. मात्र, या प्रकरणाचा गैरफायदा घेत संबंधित पोलिसांनी विद्यार्थिनीला सोबत घेत महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीमार्फत छळाची तक्रार दाखल करण्याची धमकी देत प्राचार्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात संबंधित पोलिसांनी प्राचार्यांना ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत अटक आणि संस्थेची बदनामी होईल, असा दबाव निर्माण केला. सुरुवातीला दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, भीतीपोटी प्राचार्यांनी सात लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली असून, ही रक्कम तिघांनी आपापसांत वाटून घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत विद्यार्थिनीला संशय आल्याने तिने पालकांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात संबंधित तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानंतर संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, विभागीय चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेमधील काही घटकांनीच वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळल्याचा आरोप समोर आल्याने कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. पुढील तपासात आणखी कोणते धक्कादायक तपशील उघड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

°°°°°





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने