अंबाजोगाईमध्ये शाळेतून धर्मप्रसार; धार्मिक साहित्य, जादूटोणा वस्तू आणि नशेची औषधे !

 

बीडच्या अंबाजोगाईतील शाळेत ख्रिश्चन धर्मप्रसाराचा आरोप; कपाटात धार्मिक पुस्तके, जादूटोणा साहित्य व नशेची औषधे सापडल्याचा दावा, चौकशी सुरू.

बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका नामांकित शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय परिसरातील या शाळेबाबत माहिती मिळाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट शाळेत जाऊन चौकशी केली.

कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील एका कपाटावर “S.I.N. Church” असे नाव आढळले. या कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तके, काही जादूटोण्याशी संबंधित वस्तू तसेच नशेची औषधे सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणात काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, संस्थेशी कोणताही अधिकृत संबंध नसलेला एक व्यक्ती दर रविवारी शाळेत येऊन प्रार्थना घेत असल्याचेही सांगण्यात आले. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जाऊन संस्थाचालकांकडे स्पष्टीकरण मागितले. संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, तसेच संस्थेशी संबंध नसलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षण संस्था ही धर्मप्रसारासाठी नसून शिक्षणासाठीच आहे, हा संस्थेचा मूलभूत विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले असून, अधिकृत चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण आणि संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपासात या प्रकरणामागील नेमकी सत्यता काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

°°°°°






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने