नाशिकमध्ये आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचा भांडाफोड; महिला पोलिसांनी वेशांतर करून पुरावे गोळा करत पाच आरोपींना अटक.
नाशिक : शहरात एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतराच्या प्रयत्नांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या संवेदनशील प्रकरणाचा भांडाफोड करण्यासाठी नाशिक पोलीस यांनी अत्यंत गोपनीय आणि धाडसी ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन राबवले.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील काही वरिष्ठांकडून महिला कर्मचाऱ्यांशी मीटिंगच्या नावाखाली अश्लील वर्तन केले जात असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या पार्श्वभूमीवर महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सात महिला कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने आयटी कर्मचाऱ्यांच्या वेषात कंपनीत प्रवेश करून प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास केला. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर संशयितांकडून होणारे गैरवर्तन आणि अश्लील हावभाव पोलिसांनी प्रत्यक्ष पाहिले. याशिवाय, सुमारे ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा करण्यात आले.
तपासात समोर आलेल्या बाबी अत्यंत धक्कादायक आहेत. नोकरीच्या प्रक्रियेपासूनच महिलांना लक्ष्य केले जात होते. ‘माझ्यामुळे तुला नोकरी मिळाली’ असे सांगत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता. एका पीडितेच्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
याचबरोबर एका पुरुष कर्मचाऱ्याला धर्मांतरासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाले आहे. कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचे मानसिक शोषण केले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाणे येथे आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पाच मुख्य आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, यापूर्वी अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणांनंतर नाशिकमधील हे तिसरे मोठे प्रकरण मानले जात आहे. उच्चशिक्षित आणि नामांकित कंपन्यांमध्येही महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा सखोल तपास पोलीस करत असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-------------------
