संगीत, शब्द आणि भावनांचा अविस्मरणीय संगम “मोगरा फुलला” भावगीतांच्या सुरांची संध्या

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित “मोगरा फुलला” भावगीत कार्यक्रमात नामवंत कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद.

 छत्रपती संभाजीनगर : सिंग अलाँग कराओके क्लासेस तर्फे आयोजित “मोगरा फुलला” हा भावगीतांचा सुरेल कार्यक्रम महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. सुरेल गीतांची दरवळ, भावपूर्ण निवेदनाची साथ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृह भावनांनी भारून गेले होते. या कार्यक्रमाने संगीत, शब्द आणि आठवणींचा सुंदर संगम साधत उपस्थितांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ‘दिव्य मराठी’चे स्टेट हेड सुभाष बोंद्रे हे उद्घाटक म्हणून, तर उद्योगक्षेत्रातील मान्यवर रामकांत पुलकुंडवार  कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर अविनाश चव्हाण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख जयंत शेवतेकर या मान्यवरांची उद्घाटन कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात जया महाजन यांच्या सुमधुर आवाजातील “मोगरा फुलला” या भावगीताने झाली. त्यांच्या  सादरीकरणाने वातावरणात एक प्रसन्न आणि भावपूर्ण गंध दरवळला. त्यानंतर विविध गायक कलाकारांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करत श्रोत्यांची मने जिंकली.

रवी पवार, सुनिल जोगदंड, प्रशांत मुळे, गिरीश देशपांडे, भारती तेरकर, सीमा खडतकर, आरती वडोदकर, सविता परदेशी, शिरीष देशमुख, शिवाजी काकडे, रत्ना जैस्वाल, संगीता धकाते, अनिल कोथळकर, स्वाती धोंड, पूजा हाटकर, डॉ. संध्या मोहिते, किरण शर्मा, धीरेन पारेख, प्रदीप ब्रम्हपूरकर, सोम पिसोळे, डॉ. मृणालिनी प्रभाकर, शारदा पाटील, उषा रोडे, निलेश शाह, वृषाली गायकवाड, विवेक जोशी आणि विभा जोशी या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून भावगीतांचा गोडवा आणि हळवेपणा प्रभावीपणे उलगडला. कार्यक्रम यशस्वितेसाठी संतोष महाजन यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

“धुंदी कळ्या”, “हे चिंचेचे झाड”, “फुलले रे क्षण माझे”, “शुक्रतारा मंद वारा”, “शारद सुंदर चंदेरी राती”, “लाजून हासणे”, “फिटे अंधाराचे जाळे”, “अधीर मन झाले” आणि “गारवा” यांसारख्या लोकप्रिय गीतांनी रसिकांना जुन्या आठवणींच्या विश्वात नेले. प्रत्येक गीताला मिळालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने कलाकारांचा उत्साह अधिक वाढला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संध्या मोहिते यांनी अत्यंत प्रभावी आणि भावपूर्ण शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे प्रत्येक गाण्याला वेगळी भावछटा लाभली आणि संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कलाकारांचे कौतुक करत अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, कलाकार आणि रसिकांचे आभार मानण्यात आले. “मोगरा फुलला” या भावगीतांच्या कार्यक्रमाने संगीत आणि भावनांचा सुरेख संगम साधत उपस्थितांच्या मनात सुगंधी आठवणींची फुले उमलवली.

-----------------------------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने