नवी दिल्ली : जगभरातील आर्थिक हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक मोठी चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावून तसेच रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध आणून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व परिस्थितीत भारताने कुशल धोरणात्मक निर्णय घेत रशियासोबत व्यापार सुरू ठेवत आपला फायदा साधला आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या रोझनेफ्ट आणि लुकोइल या प्रमुख तेल कंपन्यांवर थेट बंदी घातल्यानंतर भारताकडे होणारी रशियन तेलाची निर्यात तात्पुरती घटली होती. पण याच काळात रशियाने भारत आणि चीन या देशांसाठी तेलाच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे भारताला आता कच्चे तेल स्वस्त दरात उपलब्ध होत असून देशाचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यातील डिलिव्हरीसाठी रशियाच्या युरल्स क्रूड ऑईलची किंमत ब्रेंटच्या तुलनेत तब्बल ४ डॉलर प्रति बॅरलने कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरानंतर ही सर्वात मोठी किंमतकपात असून, मागील आठवड्याच्या तुलनेत आणखी दोन डॉलरने सवलत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे भारताला स्वस्तात तेल मिळाल्याने आयात खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेच्या दबावामुळे भारतातील काही रिफायनरी कंपन्यांनी रशियन तेलाची नवीन ऑर्डर तात्पुरती थांबवली होती. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, मित्तल एनर्जी, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा यात समावेश होता. मात्र आता रशियाने दिलेल्या नव्या सवलतींमुळे या कंपन्यांना पुन्हा मोठा लाभ मिळणार आहे.
चीनने देखील अमेरिकेच्या निर्बंधांनंतर समुद्रमार्गे रशियन तेल खरेदी काही काळासाठी थांबवली होती. त्यामुळे रशियाला मोठा फटका बसला. या परिस्थितीत भारतासाठी सवलतीच्या दरात तेल उपलब्ध करून रशियाने भारताशी आर्थिक संबंध अधिक मजबूत केले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला भारताने प्रत्यक्षात ठेंगा दाखवत आपला फायदा साधला आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तेलाच्या किमतीतील ही घसरण भारतासाठी ‘विन-विन’ परिस्थिती आहे. स्वस्त दरातील तेलामुळे देशाचा आयात खर्च कमी होईल, महागाईवर नियंत्रण येईल आणि ऊर्जा क्षेत्रातील स्थैर्य वाढेल. त्यामुळे भारताला निकट भविष्यात मोठा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
