8 व्या वेतन आयोगात कामगिरीवर ठरणार पगारवाढ वेतन वाढीचे स्वप्न पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाढला BP

नवी दिल्ली : पीसरकारी कर्मचाऱ्यांसाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर 8 वा वेतन आयोग अखेर मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण नवीन आयोगानुसार पगारात घसघशीत वाढ, बोनस आणि भत्त्यांचा वर्षाव होणार आहे. मात्र या आनंदाला लगेचच तडा गेला आहे, कारण सरकारने या आयोगात काही नव्या अटींचा समावेश केला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढला आहे.

नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पुलक घोष आणि पंकज जैन हे दोन सदस्य सचिव म्हणून कार्य पाहतील. नवी दिल्लीत आयोगाचे मुख्यालय असणार असून पुढील दीड वर्षात आयोग शिफारशी सादर करणार आहे. या शिफारशींवरूनच पुढे कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित होईल.

आयोगाने यावेळी मोठा बदल करण्याचे संकेत दिले आहेत. खासगी क्षेत्रात जसे KRA प्रणाली लागू असते, म्हणजे ‘जसे काम तसे दाम’, त्याच धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही कामगिरीवर आधारित वेतनवाढीचा विचार सुरू आहे. म्हणजेच, जो कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करेल त्याला इतरांपेक्षा अधिक पगारवाढ आणि भत्ते मिळतील. या पद्धतीमुळे सरकारी यंत्रणेत स्पर्धा वाढेल आणि कामकाजातील गती सुधारणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

8 व्या वेतन आयोगातंर्गत पगारवाढीचे गणित फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्ता (DA) यावर आधारित असेल. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता, तर 8 व्या वेतन आयोगात तो 2.86 पर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्याचा डीए 58 टक्के असला तरी नवीन आयोग लागू झाल्यानंतर तो शून्य होईल. त्यामुळे किमान वेतन 18,000 रुपयांहून थेट 51,480 रुपये इतके वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि क्रयशक्ती दोन्ही वाढतील. पण याचा मोठा आर्थिक बोजा केंद्र आणि राज्य सरकारांवर तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर पडू शकतो. वेतन आयोगाच्या शिफारशी या केंद्र सरकारसाठी बंधनकारक नसल्या तरी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

नवीन वेतन आयोगामुळे सरकारी कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. पण कामगिरीवर आधारित पगारवाढीच्या या नव्या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तणाव आणि स्पर्धा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

     ------------------------------------------------------------------------------------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने