दिशाभूल थांबवण्यासाठी शिक्षण संचालनालयाचे निर्देश
राज्य मंडळाच्या शाळांच्या नावांमध्ये ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’ असे शब्द वापरण्यास शिक्षण संचालनालयाने बंदी घातली असून ११ शाळांना नावे बदलण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai: राज्य मंडळाच्या अखत्यारितील शाळांकडून नावांमध्ये ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’, ‘इंग्लिश मीडियम’ अशा शब्दांचा वापर करून पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण संचालनालयाने यावर कठोर भूमिका घेतली आहे. पालकांची फसवणूक रोखण्यासाठी अशा शब्दांचा शाळांच्या नावांमध्ये वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून, संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या अनेक शाळा आपल्या नावामध्ये ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’ किंवा ‘सीबीएसई’ असे शब्द वापरत आहेत. या शब्दांमुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असल्याचा गैरसमज पालकांमध्ये निर्माण होतो. याचा थेट परिणाम पालकांच्या निर्णयावर तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होण्याची शक्यता असल्याचे संचालनालयाने नमूद केले आहे.
‘सीबीएसई’ हे केंद्र शासनाच्या अखत्यारितील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत नाव असून, राज्य मंडळाच्या शाळांनी हा शब्द वापरणे कायदेशीरदृष्ट्या अनुचित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘ग्लोबल’ असे शब्द वापरण्यासाठी संबंधित शाळेची परदेशातील शाखा किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अधिकृत संलग्नता असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांकडे अशी कोणतीही मान्यता नसतानाही हे शब्द वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर नव्याने मान्यता मागणाऱ्या तसेच दर्जावाढीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांच्या नावांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालक, विद्यार्थी आणि समाजाची दिशाभूल होईल अशी नावे असल्यास ती तात्काळ बदलण्याबाबत शाळा व्यवस्थापनांना सूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावांमध्येही असे शब्द आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यापुढे शाळा मान्यतेसाठी येणाऱ्या प्रत्येक प्रस्तावात शाळेचे नाव, त्यांचे मंडळ व माध्यम, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर चालविल्या जाणाऱ्या इतर शाळांची माहिती यांचा सर्वंकष विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांवर प्रतिकूल परिणाम करणारी नावे बदलण्यास संबंधित संस्थांना सूचित करूनच पुढील शिफारस राज्य प्राधिकरणाकडे पाठवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील ११ शाळांना नाव बदलण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मिरज, सांगली, कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. या कारवाईमुळे राज्यातील शाळा प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, यापुढे शाळांच्या नावांबाबत अधिक काटेकोर नियम लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
--------
