जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा दाबत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे कोणी येत नाही उद्धव ठाकरेंची तीव्र टीका,

परभणी: उद्धव ठाकरे यांच्या चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्याची आज परभनी येथे सांगता झाली, या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांसमोर सरकारवर आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. अतिवृष्टी, दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे ५ नोव्हेंबरपासून मराठवाडा दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, परभणी या जिल्ह्यांना भेट दिली आणि शेतकऱ्यांच्शी प्रत्यक्ष संवाद साधला.

या दौऱ्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आणि नुकसानभरपाईच्या मागणीसाठी सरकारवर दबाव आणणे हा होता. उद्धव ठाकरे म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्याही परिस्थितीत केली पाहिजे. सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजून काहीच झालं नाही. जर कर्जमुक्ती झाली नाही, तर महायुतीला मत देऊ नका.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

ठाकरेंनी यावेळी केंद्र सरकार आणि भाजपवरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं, “भाजप सांगतं की कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपालाच जातं. ही लोकशाही नाही, ही मतचोरी आहे. मतचोरीनंतर आता जमीन चोरी सुरू झाली आहे.” पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख करत सरकारवर भ्रष्टाचाराचं आरोप केलं.

परभनीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हालहवालाचा संदर्भ देत सांगितलं, “केंद्रीय पथक तुमच्या दारात आलं का? जुलैपासून परदेशी समिती झोपली का? निवडणुका आल्या की मोदीजी काहीतरी पॅकेज जाहीर करतील. पण आतापर्यंत तुमच्या हाती काहीच आलं नाही.” त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत म्हटलं की, “फडणवीस म्हणाले, मोदींचं सर्वात जास्त प्रेम बिहारवर आहे. मग महाराष्ट्र कुठे आहे?”

उद्धव ठाकरे यांनी शक्तीपीठ महामार्ग आणि अदानी समूहाशी संबंधित प्रकल्पांवरूनही केंद्रावर टीका केली. त्यांनी म्हटलं, “सिमेंट कारखान्यासाठी अदानीसाठी नियम बदलले, पण शेतकऱ्यांसाठी एक नियमही सैल केला नाही. जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा दाबत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे कोणी येत नाही.”

शेतकऱ्यांना उद्देशून ठाकरे म्हणाले, “आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट वाढतात. तुमचं घरदार उघडं पडतं. आम्ही तुमच्यासोबत आहोत, लढा द्या.” त्यांनी सरकारला आव्हान देत सांगितलं की, “मोदीजींनी नोटबंदी केली होती, आता महायुतीसाठी ‘वोटबंदी’ करावी लागेल.”

या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी लोकांशी थेट संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की, “मी शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेईन आणि कर्जमाफी होईपर्यंत हा लढा थांबवणार नाही.”

राजकीय पातळीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महायुतीवर शेतकरी वर्ग नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या भावना हाताळल्या आहेत. सरकारविरोधातील असंतोष वाढवण्याची ही त्यांची रणनीती असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.

शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले, “आता शेतकऱ्यांची वेळ आली आहे. शेतकरी उठला तर कोणत्याही सरकारचा गडी घालू शकतो. तुमचं कर्ज फेडण्यासाठी नव्हे, तर सरकारला जबाबदार धरण्यासाठी हा लढा आहे.”


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने