मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा महिन्यांत जरी परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले असले, तरी काही निवडक शेअर्सनी त्यांच्या नजरा पुन्हा भारतीय बाजाराकडे वळवल्या आहेत. हे चार शेअर्स केवळ काही महिन्यांतच मल्टीबॅगर ठरले असून गुंतवणूकदारांना तब्बल 300 टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त नफा दिला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) या कंपन्यांमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली असून, त्यावर मोठे डाव खेळले आहेत.
विद्युत आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी उपकरणे बनवणारी BGR Energy Systems Limited ही कंपनी एफपीआयंच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अव्वल आहे. 8 मे रोजी या कंपनीचा शेअर 101 रुपयांवर होता, तर गेल्या शुक्रवारी तो वाढून 410 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे चारपट झाले आहेत. जून तिमाहीत एफपीआयंची हिस्सेदारी 0.01% होती, जी सप्टेंबर तिमाहीत 0.10% वर गेली आहे.
Soma Textiles & Industries Limited या कापड व्यवसायातील कंपनीचा शेअरही मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकने सहा महिन्यांत तब्बल 243% परतावा दिला आहे. मे महिन्यात या शेअरची किंमत 43.08 रुपये होती, जी वाढून 148.15 रुपयांवर पोहोचली. जून तिमाहीपर्यंत या कंपनीत परदेशी गुंतवणूकदारांची कोणतीही हिस्सेदारी नव्हती, मात्र सप्टेंबर तिमाहीत एफपीआयनी 0.05% हिस्सा घेतला आहे.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील HBL Power Systems Limited च्या शेअरमध्येही गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये 108% वाढ झाली असून, शेअरची किंमत 468.85 रुपयांवरून वाढून 976.80 रुपये झाली आहे. बॅटरी आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाशी संबंधित या कंपनीतील एफपीआयंची हिस्सेदारी जूनमध्ये 4.83% होती, जी सप्टेंबरमध्ये वाढून 7.10% झाली आहे.
Gujarat Mineral Development Corporation (GMDC) या सरकारी कंपनीच्या शेअरनेही गुंतवणूकदारांना जवळपास 99% परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत GMDC चा स्टॉक 301.65 रुपयांवरून वाढून 599.50 रुपयांवर गेला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी जून तिमाहीतील 2.25% हिस्सेदारी वाढवून सप्टेंबर तिमाहीत ती 3.32% केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, या कंपन्यांच्या मजबूत फंडामेंटल्स, वाढता नफा आणि सरकारी पायाभूत प्रकल्पांशी संबंध यामुळे गुंतवणूकदारांचा या शेअर्सवर वाढता विश्वास दिसून येतो. तथापि, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
[ संबंधित बातमी मार्केट रिसर्च वर आधारित आहे. ही गुंतवणूक संदर्भातील टीप नाही. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना तज्ञांच्या सल्ल्याने आणि अधिकृत ठिकाणीच गुंतवणूक करावी ]
------------------------------------------------------------------------------------------------------------------
