राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

 

फडणवीस यांचा निर्णय, ५८ टक्क्यांपर्यंत वाढ जुलै २०२५ पासून लागू

मुंबई : राज्य शासनाने शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा हा निर्णय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भातील निवेदन सादर केले. मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव महागाई भत्ता जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार असून जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ मध्ये अदा करण्यात येईल. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश जारी केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाचा लाभ सुमारे ५.९६ लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच ८.१२ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून आर्थिक शिस्त राखत सकारात्मक निर्णय घेण्यावर भर देत आहे, असे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नमूद केले. या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळून त्यांच्या कुटुंबांनाही आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

------------------------------------------









Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने