शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल!

 

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरोधात अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून प्रयागराज न्यायालयाच्या आदेशानंतर पोक्सो अंतर्गत एफआयआर दाखल

प्रयागराज : अल्पवयीन मुलांच्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रयागराज येथील झुंसी पोलिस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला असून शंकराचार्यांचे शिष्य मुकुंदनंद तसेच दोन-तीन अज्ञात व्यक्तींचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

ही कारवाई आशुतोष ब्रह्मचारी महाराज यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर करण्यात आली. त्यांनी दोन अल्पवयीन मुलांना न्यायालयात सादर करत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर प्रयागराज येथील पोक्सो न्यायालयाने प्राथमिक सुनावणीनंतर संबंधित पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने नमूद केले की, आरोप गंभीर आणि दखलपात्र स्वरूपाचे असून पुरावे संकलित करण्यासाठी स्वतंत्र पोलिस तपास आवश्यक आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ देत प्रत्येक प्रकरणात स्वयंचलितपणे एफआयआर दाखल करणे बंधनकारक नसले तरी संबंधित प्रकरणात पोलिस तपास अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. खासगी तक्रारीपुरते मर्यादित न राहता गुन्हा नोंदवून चौकशी करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून निष्पक्ष आणि स्वतंत्र तपास करावा तसेच पोक्सो कायद्याच्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले. पीडितांची ओळख आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे.

तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. त्यांनी शिष्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत न्यायालयाने योग्य पाऊल उचलल्याचे सांगितले.

दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा खटला खोटा आणि बनावट असल्याचा दावा करत त्यांनी तपासात सहकार्य करू, असे म्हटले आहे. संबंधित व्यक्तींशी वैचारिक वाद सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले असून सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सदर प्रकरणात पोलिसांकडून तपासाची प्रक्रिया सुरू झाली असून न्यायालयात तपास अहवाल सादर करण्यात येणार आहे. आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून प्रकरणाकडे देशभरातील धार्मिक व कायदेशीर वर्तुळांचे लक्ष लागले आहे.

---------------------------------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने