बीड : शहरात पोलिसांनी एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सोन्याहूनही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीचा म्हणजेच ‘अंबरग्रीस’चा साठा बीडमध्ये जप्त करण्यात आला आहे. चऱ्हाटा फाटा परिसरात कारमधून विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या अंबरग्रीसची बाजारातील किंमत तब्बल दीड कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाजीनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की दोन व्यक्ती कारमधून अंबरग्रीस विक्रीसाठी बीड शहरात येत आहेत. या माहितीच्या आधारे शहराबाहेरील चऱ्हाटा फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. काही वेळातच संशयित कार तिथे पोहोचताच पोलिसांनी कार थांबवून कारवाई केली. यात शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्या जवळून सुमारे दीड किलो वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त करण्यात आली आहे. या पदार्थाची बाजारातील किंमत अंदाजे दीड कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे पोलिसांनी सांगितले. वनविभागाने या पदार्थाची प्राथमिक तपासणी केली असून पुढील तपासणीसाठी नमुना प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
अंबरग्रीस हा दुर्मीळ आणि महागडा पदार्थ मानला जातो जो सुगंधी द्रव्ये आणि औषधनिर्मितीसाठी वापरला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला मोठी मागणी आहे, त्यामुळे त्याची तस्करी अनेकदा आढळते. बीड पोलिसांच्या या कारवाईने तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा शोध लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
