इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर बोलावलेल्या असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्स बैठकीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; वरिष्ठ नेतृत्वाला मोठा फटका.
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायलमधील युद्ध अधिक तीव्र होत असतानाच एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते Ali Khamenei यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदासाठी नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या ‘Assembly of Experts’ या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात इराणच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
इराणची राजधानी तेहरानसह कोम शहरात मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी 88 सदस्यांची ही सभा बोलावण्यात आली होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व सदस्य उपस्थित होते की नाही याबाबत स्पष्ट माहिती नसली तरी मोठ्या संख्येने वरिष्ठ नेते उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्याच वेळी इस्रायलने या सभास्थळालाच लक्ष्य केल्याची माहिती आहे.
इस्रायलने यापूर्वीही इराणमधील राष्ट्रपती भवन, सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलची इमारत आणि लष्कराचे मुख्यालय अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नव्या हल्ल्यामुळे इराणची टॉप लीडरशिप जवळपास संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे.
इराणी सूत्रांच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील अनेक नेतेही ठार झाले आहेत. नव्याने नियुक्त संरक्षण मंत्री अल रेझाही हल्ल्यात मारले गेल्याचे वृत्त आहे. सध्या देशात केवळ राष्ट्रपती Masoud Pezeshkian, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख गुलाम हुसेन मोहसनी एजई आणि गार्डियन कौन्सिलचे सदस्य अली रझा आराफी यांसारखे काही मोजके वरिष्ठ नेते शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींमुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती निर्माण झाली आहे. सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर असताना झालेल्या या हल्ल्यामुळे देशाच्या सत्ताकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचे दावे केले जात असून अधिकृत आकडेवारीबाबत स्पष्टता नसली तरी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचे दिसत आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला असून त्याचे जागतिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------------------------------------------
