13 वर्षे कोमामध्ये असलेल्या हरीश राणा यांचे निधन; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पॅसिव्ह युथेनेशिया परवानगीनंतर एम्स दिल्लीमध्ये जीवनप्रवास संपला.
नवी दिल्ली : देशात ‘पॅसिव्ह युथेनेशिया’ म्हणजे इच्छा मरणासंदर्भात ऐतिहासिक ठरलेल्या प्रकरणातील रुग्ण हरीश राणा यांचे अखेर निधन झाले. जवळपास १३ वर्षे कोमामध्ये असलेल्या राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी एम्स दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. दीर्घ काळ चाललेल्या शारीरिक आणि कायदेशीर संघर्षानंतर त्यांचा जीवनप्रवास शांततेत आणि सन्मानाने संपला.
पंजाब विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत असताना २०१३ मध्ये झालेल्या अपघाताने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली होती. हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर ते ‘परसिस्टेंट व्हेजिटेटिव्ह स्टेट’मध्ये गेले. त्या दिवसापासून ते पूर्णपणे कोमामध्ये होते. गेली अनेक वर्षे गाझियाबाद येथील घरी त्यांच्यावर कृत्रिम पोषण आणि वैद्यकीय सहाय्याद्वारे उपचार सुरू होते.
स्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मानवीय दृष्टिकोनातून विचार करून न्यायालयाने ११ मार्च रोजी हरीश राणा यांना ‘पॅसिव्ह युथेनेशिया’ची परवानगी दिली. त्यानंतर १४ मार्च रोजी त्यांना एम्समधील डॉ. बी.आर. आंबेडकर कॅन्सर रुग्णालयाच्या पॅलिएटिव्ह केअर विभागात दाखल करण्यात आले.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विशेष वैद्यकीय योजना तयार केली होती. या प्रक्रियेनुसार त्यांना दिले जाणारे कृत्रिम पोषण हळूहळू थांबवण्यात आले, ज्यामुळे कोणताही त्रास न होता त्यांचा मृत्यू सन्मानपूर्वक व्हावा, याची काळजी घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता.
देशात या प्रकारातील हे पहिलेच प्रकरण ठरले आहे, ज्यामध्ये न्यायालयाने रुग्णाला सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याची परवानगी दिली. हरीश राणा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांचा दीर्घकाळाचा संघर्ष संपला असून, या प्रकरणामुळे भविष्यात पॅसिव्ह युथेनेशियासंदर्भातील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रियांना दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
--------------------------------------------
