हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शास्त्रांनुसार माघ महिन्यातील ही वर्षातील सर्वाधिक फलदायी मानली जाते.
माघ पौर्णिमा या दिवशी स्नान, दान, पूजा, जप आणि व्रतकथा वाचन केल्यास विशेष पुण्यफल प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मान्यतेनुसार माघ पूर्णिमेच्या दिवशी सर्व देवी-देवता स्वर्गलोकातून पृथ्वीवर येऊन गंगा तसेच इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. त्यामुळे या दिवशी नदी किंवा पवित्र जलात स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदा माघ पूर्णिमा १ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होत असून, या दिवशी व्रतकथा वाचन अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
पौराणिक कथेनुसार एका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण आपल्या पतिव्रता पत्नी रूपवतीसोबत राहत होता. दोघेही धार्मिक, सदाचारी आणि दानशील होते; मात्र त्यांना संतान नसल्यामुळे ते कायम दुःखी असत. एकदा नगरात आलेल्या एका महात्म्याने सर्वांकडून दान स्वीकारले, परंतु धनेश्वरच्या पत्नीचे दान घेण्यास त्यांनी नकार दिला. यामागचे कारण विचारले असता, निसंतान दांपत्याकडून घेतलेले दान फलदायी ठरत नाही, असे महात्म्यांनी सांगितले.
संतानप्राप्तीचा उपाय विचारल्यावर महात्म्यांनी धनेश्वरला १६ दिवस देवी कालीची विधीपूर्वक उपासना करण्याचा सल्ला दिला. दांपत्याने श्रद्धेने कठोर तपस्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी कालीने त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला, मात्र त्या पुत्राचे आयुष्य केवळ १६ वर्षांचे असेल, असेही सांगितले. हे ऐकून व्याकुळ झालेल्या दांपत्याला देवीने उपाय सांगितला की, जर त्यांनी विधीपूर्वक ३२ पोर्णिमाचे व्रत केले, तर पुत्र दीर्घायुषी होईल.
देवीच्या आदेशानुसार आम्रफळ ग्रहण केल्यानंतर रूपवती गर्भवती झाली आणि कालांतराने पुत्राचा जन्म झाला. त्याचे नाव देवीदास ठेवण्यात आले. देवीदास १६ वर्षांचा होताच माता-पिता पुन्हा चिंतेत पडले. त्यांनी देवीदासला विद्याध्ययनासाठी मामासोबत काशीला पाठवले. प्रवासादरम्यान त्याचा विवाह झाला. आपल्या अल्पायुष्याची माहिती देवीदासने पत्नीला दिली आणि आपले अस्तित्व कळण्यासाठी एक पुष्पवाटिकेची निशाणी सांगून ठेवली.
निश्चित वेळ येताच देवीदासवर मृत्यूचे संकट आले, मात्र माता-पित्यांनी केलेल्या ३२ पूर्णिमा व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकरांनी त्याला जीवनदान दिले. त्याच वेळी पुष्पवाटिका पुन्हा हिरवीगार झाल्याने पत्नीला देवीदास जिवंत असल्याचा संकेत मिळाला. विद्याध्ययन पूर्ण करून देवीदास सुखरूप घरी परतला आणि कुटुंबात आनंदाचे दिवस परतले.
धार्मिक श्रद्धेनुसार माघ पौर्णिमेची ही कथा श्रद्धेने वाचल्यास किंवा ऐकल्यास संतानसुख, आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. माघ पूर्णिमेच्या दिवशी केलेले स्नान व दान हे ३२ पूर्णिमांच्या पुण्याइतके फल देत असल्यामुळे या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते.
__
