१ फेब्रुवारीपासून देशात लागू झाले हे ५ मोठे बदल
एकूणच १ फेब्रुवारीपासून लागू झालेल्या या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि खर्चावर स्पष्टपणे दिसून येणार आहे.
आजपासून फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली असून, महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशात अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. एकीकडे आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना, दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किमतींपासून ते फास्टॅगच्या नियमांपर्यंतचे बदल थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करणारे ठरणार आहेत. या बदलांचा परिणाम घरगुती खर्च, प्रवास आणि दैनंदिन जीवनावर जाणवणार आहे.
महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. १ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार १९ किलो वजनाचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात या सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार दिल्लीत सिलिंडरची किंमत १६९१.५० रुपयांवरून १७४०.५० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये १७९५ रुपयांवरून १८४४.५० रुपये, मुंबईत १६४२.५० रुपयांवरून १६९२ रुपये, तर चेन्नईत १८४९.५० रुपयांवरून १८९९.५० रुपये इतकी किंमत झाली आहे. मात्र १४ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एलपीजीच्या दरवाढीसोबतच हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ फेब्रुवारीपासून हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्युएलच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. एटीएफच्या किमती कमी झाल्याने आगामी काळात विमान प्रवासाचा खर्च काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. दिल्लीत एटीएफचा दर ९२,३२३.०२ रुपयांवरून ९१,३९३.३९ रुपये प्रति किलोलीटर झाला आहे. कोलकातामध्ये ९५,३७८.०२ रुपयांवरून ९४,४४५.६२ रुपये, मुंबईत ८६,३५२.१९ रुपयांवरून ८५,४७४.६३ रुपये, तर चेन्नईत ९५,७७० रुपयांवरून ९४,७८१.९९ रुपये प्रति किलोलीटर इतका दर निश्चित करण्यात आला आहे.
१ फेब्रुवारीपासून पान-मसाला आणि सिगारेटचे सेवन करणाऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार तंबाखूजन्य उत्पादने आणि पान-मसाल्यावर अतिरिक्त कर लागू होऊ शकतो. जीएसटी व्यतिरिक्त आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लावण्याची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली होती. नव्या कररचनेमुळे पान-मसाला आणि सिगारेटच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी फास्टॅगशी संबंधित नियमातही बदल करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून कार, जीप आणि व्हॅनसाठी फास्टॅग जारी करताना केवायसी पडताळणी प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला असून, यामुळे नवीन फास्टॅग घेणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात बँकेशी संबंधित कामे करणाऱ्यांनी सुट्ट्यांची यादी पाहूनच नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसारख्या कारणांमुळे सुमारे १० दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहारांसाठी नागरिकांना आधीच तयारी करावी लागणार आहे.
_____
