केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज १ फेब्रुवारी रोजी देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच सराफा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली. शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून, चांदीच्या किमतींमध्ये तब्बल १९ टक्क्यांची, तर सोन्याच्या दरात सुमारे २ टक्क्यांची घट झाली आहे. बळकट अमेरिकन डॉलर आणि जागतिक बाजारातील मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
शनिवारी चांदीच्या दरात सुमारे ७२ हजार ५०० रुपयांची घसरण झाली असून, चांदीचा दर आता ३ लाख १२ हजार रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. हे दर सर्व करांसह असून, सलग दोन दिवस चांदीचे भाव घसरत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात गुरुवारी चांदीचा दर ४ लाख ४० हजार ५०० रुपये प्रतिकिलो या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या जोरदार विक्रीमुळे काही दिवसांतच चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.
सोन्याच्या दरातही शनिवारी लक्षणीय घट झाली. सराफ बाजारात सोन्याचा दर ३,५०० रुपयांनी म्हणजेच सुमारे २.०७ टक्क्यांनी घसरला. दिवसअखेरीस सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १ लाख ६५ हजार ५०० रुपये इतका नोंदवण्यात आला. मागील आठवड्यात गुरुवारी सोन्याचा दर १ लाख ८३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर गेला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि नफावसुलीमुळे आठवड्याभरातच सोन्याचे दर पुन्हा खाली आले आहेत.
जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने आणि आगामी आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीतून काही प्रमाणात माघार घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढउतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पानंतर बाजाराची पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यापारी आणि गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत.
-------
