दंगलीत वापरून फेकलं जातं; इंदुरीकर महाराजांची परखड टीका आणि आवाहन
Indurikar Maharaj यांनी तरुणांना दंगलीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. मोबाईलमुळे शिक्षण बिघडत असल्याची टीका करत परीक्षा काळात मोबाईल बंदीची मागणी
अकोला : जिल्ह्यातील एका कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी तरुण, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या मुलांशी थेट संवाद साधत अनेक संवेदनशील विषयांवर परखड मत मांडले. सध्याच्या सामाजिक वास्तवावर भाष्य करताना त्यांनी दंगली, मोर्चे, मोबाईलचा अतिरेक, शिक्षणाची अवस्था आणि तरुण पिढीची दिशाभूल यावर तीव्र शब्दांत टीका केली.
इंदुरीकर महाराज म्हणाले की, आज तरुणांना मोर्चे, दंगली आणि आंदोलनांमध्ये ओढून नेलं जात आहे, मात्र या सगळ्यात गरिबांचीच पोरं अडकतात. मोठ्या श्रीमंतांची पोरं कधीही अशा प्रकरणांत दिसत नाहीत आणि त्यांना तसं जाऊ दिलंही जात नाही. दंगलीत सहभागी झालात तर दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, कारण आज सर्वत्र सीसीटीव्ही, कॅमेरे आणि डिजिटल पाळत आहे. पेनमध्येही कॅमेरे आहेत, त्यामुळे कुठेही लपणं शक्य नाही. आज कोणत्याही नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक असतं, त्यामुळे दंगलीच्या भानगडीत पडून आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका, असं आवाहन त्यांनी तरुणांना केलं.
शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना इंदुरीकर महाराजांनी शाळांमधील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना मुलं अभ्यास करत नाहीत, मोबाईलमध्येच अडकून पडली आहेत. त्यामुळे परीक्षा काळात राज्यातील शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. आजची पोरं अभ्यास सोडून रम्मी, मोबाईल गेम आणि इतर गोष्टींमध्ये वेळ घालवत असल्याने भवितव्य अंधारात जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शेती आणि रोजगाराच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, स्वतः दीड वर्षे शेती करून पाहिली असून, केवळ शेतीवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. भाजीपाला, किराणा किंवा नियमित उत्पन्न देणारं कोणतंही काम शिकावं, जेणेकरून घर चालवता येईल, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.
यावेळी इंदुरीकर महाराजांनी मुली आणि प्रेमसंबंधांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मात्र मोठी चर्चा निर्माण झाली. ते म्हणाले की, अनेकदा मुली चांगल्या, कष्टाळू आणि हुशार मुलांच्या प्रेमात पडत नाहीत, तर चोरी, गुन्हेगारी करणाऱ्या किंवा दरिद्री मुलांच्या नादी लागतात. अशा मुलांसोबत पळून गेलेल्या मुली आयुष्यात कधीच सुखी राहत नाहीत. आई-वडिलांची मान खाली घालणारी मुलगी नंतर कितीही सांगितलं तरी ती मनाने सुखी नसते, असा ठाम दावा त्यांनी केला.
आपण जे बोलतो ते सत्य असतं, मात्र सत्य बोलल्यामुळेच आपल्यावर सातत्याने टीका होते, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. गेली ३१ वर्षे लोकांच्या शिव्या खात आलो आहे, पण त्यामुळे सत्य बोलणं थांबवणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
एकूणच, इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यामुळे तरुण पिढी, शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक वास्तवावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं असून, त्यांच्या परखड शैलीतील विधानांमुळे वाद होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------
