नमाजदरम्यान इस्लामाबाद हादरलं: मशिदीत भीषण बॉम्बस्फोट!

 


 किमान 50 जणांचा मृत्यू; शहरात इमर्जन्सी जाहीर

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये नमाजदरम्यान शिया मशिदीत भीषण आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. 50 ठार, 70 जखमी; संपूर्ण शहरात इमर्जन्सी जाहीर.

इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आज भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरली. नमाज सुरू असतानाच तारलाई भागातील एका मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात किमान 50 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि सीडीए हॉस्पिटलसह तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर राजधानीत तात्काळ इमर्जन्सी घोषित करण्यात आली असून संपूर्ण शहरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला आत्मघाती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळी मृतदेहांचे अवयव विखुरलेले आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, दहशतवादविरोधी पथके आणि पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी धाव घेत परिसर पूर्णतः सील केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी इस्लामाबादमधील प्रमुख मार्ग बंद करण्यात आले असून संशयित हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार हा स्फोट कसर-ए-खदीजतुल कुबरा या मशिदीत झाला असून ती शिया समुदायाची मशीद म्हणून ओळखली जाते. पाकिस्तानमध्ये शिया समुदायाची लोकसंख्या सुमारे दोन कोटी असून देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 ते 12 टक्के इतकी आहे. या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामागे सांप्रदायिक दहशतवादाचा संशय अधिक बळावला आहे.

स्फोटानंतरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये घबराटलेल्या नागरिकांची पळापळ, जखमींना मदत करताना दिसणारी दृश्ये आणि सुरक्षादलांची हालचाल स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या घटनेने संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे नोव्हेंबर 2025 नंतर इस्लामाबादमध्ये घडलेला हा दुसरा मोठा स्फोट आहे. यापूर्वी इस्लामाबाद न्यायालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबानने स्वीकारली होती. आजच्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी तपास यंत्रणा सर्व शक्य कोनातून चौकशी करत आहेत.

--------------------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने