अमृतमहोत्सव सोहळ्यात माजी मंत्री बसवराज पाटील यांचे गौरवोद्गार
उमरगा येथे डॉ. सुभाष येळापूरे यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात माजी मंत्री बसवराज पाटील यांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचे गौरवोद्गार काढले.
उमरगा : शहरातील संगमेश्वर हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवजीवन देणारे डॉ. सुभाष येळापूरे हे केवळ वैद्यकीय व्यावसायिक नसून सेवाभाव, समाजनिष्ठा आणि माणुसकीचे चालते-बोलते उदाहरण असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजप लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. उमरग्याच्या आरोग्यसेवेत डॉ. येळापूरे यांचे नाव विश्वास, आधार आणि श्रद्धेचे प्रतीक बनले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उमरगा शहरातील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुभाष विश्वनाथप्पा येळापूरे यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ओम बालाजी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बसवराज पाटील यांनी डॉ. येळापूरे यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमास पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार प्रवीण स्वामी, माजी खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नील व्हते, सभापती बसवराज कस्तुरे, माजी सभापती जितेंद्र शिंदे, संताजी चालुक्य, अभय चालुक्य, मदन पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाराणसी येथून आलेल्या पंडितांनी मंत्रोच्चार करत केलेल्या गंगा आरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. सुभाष येळापूरे आणि सौ. ललिता सुभाष येळापूरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी आणि माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत ग्रामीण भागात अत्यंत अल्प दरात वैद्यकीय सेवा देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ. येळापूरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
यावेळी औषधांच्या गोळ्यांनी डॉ. सुभाष येळापूरे यांचा तुलाभार करण्यात आला, ही बाब उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. राज्यभरातील वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी चांगली, सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी मातापित्यांचे भाग्य लागते, असे सांगितले. जन्मवर्षाचा अमृतमहोत्सव हा तीन पिढ्यांना दिशादर्शक ठरणारा कार्यक्रम असून तो एकत्रित कुटुंब व्यवस्था अधिक मजबूत करतो, असे मत व्यक्त करण्यात आले. समाजात सक्षमपणे कार्य करून मातृ-पितृ ऋण फेडणारी पिढी पाहणे, हाच अमृतमहोत्सवाचा खरा आनंद असल्याचे सांगत डॉ. सुभाष येळापूरे आणि डॉ. निलेश येळापूरे या पिता-पुत्र जोडीचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलेश येळापूरे यांनी केले, तर शैलजा हसबे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास डॉ. काशिनाथ चिंचोळी, डॉ. मल्लिनाथ मलंग, डॉ. उदय मोरे, मुरूमचे माजी नगराध्यक्ष रशीद शेख, नितीन होळे, मेघराज बरबडे, प्राचार्य उल्हास घुरघुरे, चेअरमन दत्ता चटगे, नगरसेवक गौस शेख, रमेश चव्हाण, सुजित शेळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________



