३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार ३९ हजार १४७ मतदान केंद्र
मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
Mumbai: महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणूक २०२६ चा धुरळा उडाला असून नव्या वर्षाच्या पहिल्याच पंधरा दिवसांत राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली होती.
या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबरला संपली असून आता सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी माघारीनंतर नाराजांची नाराजी दूर करून राज्यभरात प्रचाराचा जोर वाढणार आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मित महानगरपालिका आहेत. पाच महानगरपालिकांची मुदत २०२० मध्ये संपली होती, तर सर्वाधिक १८ महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली. चार महानगरपालिकांची मुदत २०२३ मध्ये संपलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या महानगरपालिकांची मुदत २०२० मध्ये संपली होती. नागपूर, मुंबई, सोलापूर, अमरावती, अकोला, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, उल्हासनगर, ठाणे, चंद्रपूर, परभणी, लातूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर आणि नांदेड-वाघाळा या महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली होती. सांगली-मिरज-कुपवाड, जळगाव, अहिल्यानगर आणि धुळे या महानगरपालिकांची मुदत २०२३ मध्ये संपली आहे.
मुंबई वगळता उर्वरित २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून दिला जाणार असल्याने प्रत्येक मतदाराला एकच मत द्यावे लागणार आहे. इतर महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एका प्रभागात साधारण तीन ते पाच सदस्य निवडले जाणार असून प्रत्येक मतदाराला किमान तीन ते पाच मते द्यावी लागणार आहेत.
या निवडणुकांसाठी राज्यात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार नोंदणीकृत असून त्यांच्यासाठी ३९ हजार १४७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची उपलब्धता करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील सुमारे १० हजार १११ मतदान केंद्रांसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल युनिट आणि २२ हजार ६९८ बॅलेट युनिट तैनात करण्यात येणार आहेत.
एकूण मतदारांपैकी १ कोटी ८१ लाख ९३ हजार ६६६ पुरुष, १ कोटी ६६ लाख ७९ हजार ७५५ महिला तर ४ हजार ५९६ इतर मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण ८९३ प्रभागांमधून २ हजार ८६९ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये महिलांसाठी १ हजार ४४२ जागा, अनुसूचित जातींसाठी ३४१ जागा, अनुसूचित जमातींसाठी ७७ जागा आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी ७५९ जागा आरक्षित आहेत.
निवडणूक खर्चाच्या मर्यादेबाबतही स्पष्ट नियम जाहीर करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्ग महानगरपालिकांमध्ये म्हणजे पुणे व नागपूर येथे उमेदवारांना १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. ‘ब’ वर्ग महानगरपालिकांमध्ये १३ लाख, ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये ११ लाख तर ‘ड’ वर्गातील उर्वरित महानगरपालिकांमध्ये ९ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आली. ३१ डिसेंबरला छाननी झाली असून २ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी माघारीची अंतिम मुदत आहे. ३ जानेवारीला निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
-----------
