महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावर थेट आरोप
पिंपरीत भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर भाष्य करत भाजपच्या राजवटीतील महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, कर्जबाजारी कारभार आणि निविदा रिंगवर जोरदार टीका केली.
पिंपरी : ज्यांनी माझ्यावर जलसंपदा विभागात ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, ते आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत. आज त्याच लोकांसोबत मी सत्तेत सहभागी आहे, असे परखड विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महापालिकेतील कारभार, भाजपच्या राजवटीतील आर्थिक स्थिती आणि कथित भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली.
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिका आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जात होती. त्या काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली, मात्र महापालिकेला कधीही कर्जबाजारी करण्यात आले नाही. उलट भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेच्या ठेवी वाढण्याऐवजी घटल्या. विकास दाखवण्यासाठी ठेवी मोडल्या गेल्या, कर्जरोखे काढण्यात आले आणि त्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत सापडली, असा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या कार्यकाळात निविदांमध्ये रिंग करून अनेक कामे लाटण्यात आली. चांगले रस्ते उखडून पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, त्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावण्यात आली, फुटपाथवर अतिक्रमण करून हप्ते वसुली केली जात आहे आणि वाहनतळांची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.
महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलताना अजित पवारांनी काही लोकांची मालमत्ता अल्पावधीत कशी वाढली, असा सवाल उपस्थित केला. श्वान नसबंदी योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, मागील वर्षी सुमारे २० हजार नागरिकांना श्वानांनी चावा घेतला. जर नसबंदी झाली असेल, तर ते श्वान गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिकेत सध्या धुलाई सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
_______
