मतदानाआधीच ६४ उमेदवार बिनविरोध भाजपाची आघाडी!

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये मतदानापूर्वीच महायुतीने आघाडी घेतली असून भाजपासह शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मतदानापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेत विजयाचा गुलाल उधळला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राज्यभरात विरोधी पक्ष, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर माघार घेतल्यामुळे महायुतीचे तब्बल ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच महायुतीने महापालिका निवडणुकांमध्ये अर्धशतक पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या कालावधीत भाजपाने नाराज नेते आणि बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवले. त्याचवेळी अनेक ठिकाणी प्रमुख विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने महायुतीच्या अनेक जागा बिनविरोध झाल्या. या बिनविरोध विजयांमध्ये भाजपाची संख्या सर्वाधिक असून एकट्या भाजपाचे ४४ उमेदवार मतदानाविना नगरसेवक झाले आहेत. शिंदेसेनेचे १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार आधीच विजयी झाले आहेत. याशिवाय मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीचा एक उमेदवारही बिनविरोध निवडून आला आहे.

जळगाव महापालिकेत महायुतीचा प्रभाव ठळकपणे दिसून आला असून येथे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा आणि भाजपाचे सहा उमेदवार आहेत. अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक सात ‘ब’ मधून भाजपाच्या उमेदवार पुष्पा बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पनवेल महापालिकेतही अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अचानक माघार घेतल्यामुळे भाजपाचे सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीचा विशेष बोलबाला पाहायला मिळाला. येथे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यामध्ये भाजपाचे १५ तर शिंदेसेनेचे सहा उमेदवार आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे आणि अपक्ष उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीने विजयी जल्लोष साजरा केला आहे.

ठाणे महापालिकेतही शेवटच्या दिवशी राजकीय चित्र झपाट्याने बदलले. ठाणे महापालिकेसाठी सुरुवातीला १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर ९९ अर्ज बाद झाले, तर १ जानेवारी रोजी २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र २ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या माघारीमुळे वागळे इस्टेट आणि वर्तकनगर परिसरात शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले.

एकूणच राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मतदानापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेतली असून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येमुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. या घडामोडींचा उर्वरित जागांवरील थेट निवडणूक लढतींवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


_______




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने