जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा अंदाज आहे.
नवी दिल्ली : जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा ऐतिहासिक टप्पा भारताने गाठला आहे. जपानला मागे टाकत भारताने हे स्थान मिळवले असून देशाची सकल देशांतर्गत उत्पादन क्षमता सध्या सुमारे 4.18 ट्रिलियन अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. मजबूत देशांतर्गत मागणी, सातत्यपूर्ण संरचनात्मक सुधारणा आणि स्थिर आर्थिक धोरणांमुळे भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पुढे आला आहे.
सरकारी माहितीनुसार, वित्त वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताची वास्तविक जीडीपी वाढ 8.2 टक्क्यांवर पोहोचली आहे. पहिल्या तिमाहीतील 7.8 टक्के आणि मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील 7.4 टक्क्यांच्या तुलनेत ही वाढ अधिक असून गेल्या सहा तिमाहीतील ही सर्वाधिक वाढ मानली जात आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेनंतरही भारताने ही कामगिरी नोंदवली आहे.
सरकारने व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, भक्कम आर्थिक पायावर उभा असलेला भारत 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्या वेळेपर्यंत भारताची जीडीपी सुमारे 7.3 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या तर जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थांनीही भारताच्या आर्थिक भवितव्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. जागतिक बँकेने 2026 साठी भारताचा विकासदर 6.5 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. मूडीजच्या मते, 2026 मध्ये भारताचा विकासदर 6.4 टक्के तर 2027 मध्ये 6.5 टक्के राहील आणि जी-20 देशांमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2025 साठी भारताचा विकासदर वाढवून 6.6 टक्के तर 2026 साठी 6.2 टक्के केला आहे. ओईसीडीने 2025 मध्ये 6.7 टक्के आणि 2026 मध्ये 6.2 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. एस अँड पीने चालू आर्थिक वर्षात 6.5 टक्के आणि पुढील वर्षात 6.7 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आशियाई विकास बँकेने 2025 साठी 7.2 टक्के तर फिच रेटिंग्सने मजबूत ग्राहक मागणीचा हवाला देत 2026 मध्ये 7.4 टक्के वाढीचा अंदाज दिला आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, महागाई दर सहनशील मर्यादेत आहे, बेरोजगारीत घट होत आहे आणि निर्यात क्षेत्रात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. वित्तीय परिस्थिती स्थिर असून वाणिज्यिक क्षेत्राला पुरेसा कर्जपुरवठा होत आहे. शहरी भागातील वाढती खपतही आर्थिक गतीला बळ देत आहे.
2047 पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न असलेला देश बनण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असताना भारत आर्थिक वाढ, संरचनात्मक सुधारणा आणि सामाजिक प्रगतीच्या मजबूत पायावर उभा आहे, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
----------------------------------------------
