थायलंडमध्ये धावत्या ट्रेनवर कन्स्ट्रक्शन क्रेन कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
बँकॉक : थायलंडमध्ये एक अत्यंत भीषण आणि हादरवून टाकणारा अपघात घडला आहे. देशाच्या उत्तर-पूर्व भागात धावत्या प्रवासी ट्रेनवर कन्स्ट्रक्शन क्रेन कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या अपघातात किमान 22 जणांचा मृत्यू झाला असून 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ही दुर्घटना बुधवारी सकाळी राजधानी बँकॉकपासून सुमारे 230 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखियो जिल्ह्यात घडली. बँकॉकहून उबोन रत्चाथानी प्रांताकडे जाणारी प्रवासी ट्रेन या मार्गावरून जात असताना, हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. काम सुरू असताना एका मोठ्या कन्स्ट्रक्शन क्रेनचा तोल जाऊन ती थेट ट्रेनच्या एका डब्यावर कोसळली.
क्रेन कोसळताच ट्रेन रुळावरून घसरली आणि काही वेळातच डब्याला आग लागली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांच्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि बचाव पथक तातडीने दाखल झाले.
क्रेन आणि ट्रेनची धडक इतकी जबरदस्त होती की ट्रेनची छत आतमध्ये कोसळली, खिडक्या फुटल्या आणि लोखंडी संरचना पूर्णपणे वाकडी झाली. अनेक प्रवासी मलब्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर करावा लागत आहे. क्रेन आणि ट्रेन एकमेकांत अडकून पडल्यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे.
थायलंड रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेनमध्ये सीटिंग प्लॅननुसार सुमारे 195 प्रवासी प्रवास करत होते. मात्र प्रत्यक्ष प्रवाशांची संख्या यापेक्षा वेगळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गंभीर अपघाताची दखल घेत थायलंडचे उपपंतप्रधान आणि परिवहन मंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
थायलंडमध्ये औद्योगिक आणि बांधकाम स्थळांवर होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी असून सुरक्षा नियमांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा बांधकाम स्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
---------------------------------
