अमेरिकी शुल्कवाढीच्या भीतीने शेअर बाजारात घसरण; रिलायन्स, एचडीएफसी बँक दबावात, तर एसबीआयचा शेअर तेजीत राहिला.
मुंबई: भू-राजकीय तणाव, वेनेझुएलावरील अमेरिकेची कारवाई आणि रशियन तेलाच्या आयातीसंदर्भात संभाव्य शुल्कवाढीच्या इशाऱ्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने मोठा धसका घेतला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये तीव्र विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांत सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदवण्यात आली.
दिवसअखेर सेन्सेक्स ३७६.२८ अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी घसरून ८५,०६३.३४ पातळीवर बंद झाला. सत्रादरम्यान सेन्सेक्सने ५३९.५२ अंकांची घसरण नोंदवत ८४,९००.१० या दिवसातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे, निफ्टी ५० निर्देशांक ७१.६० अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी घसरून २६,१७८.७० पातळीवर स्थिरावला.
देशांतर्गत आघाडीवर मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे बाजारावर दबाव कायम राहिला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयटीसी, कोटक महिंद्र बँक आणि इंटरग्लोब एव्हिएशन या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. तज्ञांच्या मते, वेनेझुएलावरील अमेरिकेचा हल्ला, रशियन तेलाच्या आयातीबाबत निर्माण झालेले संकट आणि तिसऱ्या तिमाहीच्या निकालांबाबतची अनिश्चितता यामुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ४.४७ टक्क्यांची घसरण झाली असून शेअर १,५०७.६० रुपयांवर बंद झाला. एका दिवसात या समभागात ७०.५० रुपयांची घसरण नोंदवली गेली. सत्रादरम्यान शेअरने १,४९६.३० रुपयांचा नीचांक आणि १,५६९ रुपयांचा उच्चांक गाठला होता. या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सुमारे २०.५७ लाख कोटी रुपयांवर आले आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानंतर समभागावर दबाव वाढला असला तरी कंपनीने हा दावा अधिकृतरित्या फेटाळला आहे.
दरम्यान, एकूण बाजारातील नकारात्मक वातावरणातही स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर मात्र तेजीत राहिला. मंगळवारी एसबीआयच्या शेअरमध्ये १३.४० रुपयांची वाढ झाली. एनएसईवर हा शेअर १,०१८.९० रुपयांवर तर बीएसईवर १,०१८.७५ रुपयांवर बंद झाला. मोठ्या प्रमाणातील ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे गुंतवणूकदारांचा या समभागाकडे ओढा दिसून आला.
एसबीआयचा शेअर सलग सहा ट्रेडिंग सत्रांत मजबूत राहिला असून या कालावधीत सुमारे ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टेट बँकेच्या शेअरने २७ टक्क्यांची दमदार कामगिरी केली आहे. शेअरमधील या तेजीमुळे बँकेचे बाजारमूल्य ९.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, आगामी काळात १० लाख कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने एसबीआयला बँकिंग क्षेत्रातील पसंतीचा ‘बाय’ स्टॉक म्हटले असून, शेअर १,१०० रुपयांचा टप्पा पार करू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनेही एसबीआयचा लक्ष्यभाव १,१२० रुपये दिला आहे. बँकेची कमाई आणि व्यवसाय मजबूत असून क्रेडिट कॉस्ट नियंत्रणात आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कर्जवाढ १३ ते १४ टक्क्यांदरम्यान राहील, अशी अपेक्षा बँकेने व्यक्त केली आहे.
एकूणच अमेरिकी धोरणांबाबतची अनिश्चितता आणि जागतिक पातळीवरील तणाव यामुळे बाजारातील भावना दबावाखाली असून, आगामी सत्रांत गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडी आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांकडे लागून राहणार आहे.
____
