महापालिका निवडणुक तापली; वादग्रस्त विधाने, अनपेक्षित युती आणि सत्तासंघर्षाने राजकारण ढवळून निघाले !

 राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले असून गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडींनी निवडणूक रणधुमाळीला वेगळे वळण मिळाले.

मुंबई : एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप अडचणीत सापडली असताना, दुसरीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. या दोन्ही घटनांमुळे सत्ताधारी महायुतीतील अंतर्विरोध उघड झाले असून विरोधकांना आक्रमक होण्याची संधी मिळाली आहे.

राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका सुरू असताना गुजरातील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला. सूरत येथे पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्यावर महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवप्रेमी संघटनांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे विधान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातशी जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप करत भाजपवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे राजे असून त्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या वादाच्या पार्श्वभूमीवरच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत घडलेल्या राजकीय घडामोडींनी आणखी खळबळ उडवली. अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजपने थेट काँग्रेससोबत युती केली. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक एकत्र येत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुले यांचा विजय झाला. विशेष म्हणजे, नगरसेवकांच्या संख्येत शिवसेना शिंदे गट आघाडीवर असतानाही सत्तेपासून त्यांना दूर ठेवण्यात आले.

या अनपेक्षित युतीवर शिवसेना शिंदे गटाने तीव्र आक्षेप घेतला असून ही ‘अभद्र युती’ असल्याची टीका केली आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या भाजपनेच काँग्रेससोबत हातमिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांनी शिंदे गटासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रतिसाद न मिळाल्याचा दावा केला आहे.

एकीकडे शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानामुळे भाजप अडचणीत असताना, दुसरीकडे अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस युतीमुळे महायुतीतील तणाव उघड झाला आहे. मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी, महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले असून येत्या काळात प्रचार अधिकच आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक निवडणुकांचे राजकारण आता राज्यस्तरीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहे.


______



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने