भारतीय शेअर बाजारात सलग घसरण सुरू असून पाच दिवसांत सेन्सेक्स २२०० अंकांनी घसरला आहे. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, अमेरिकन टॅरिफ धोरणे आणि तिमाही निकालांपूर्वीची सतर्कता यामुळे बाजारावर दबाव आहे.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत असून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर दबाव कायम आहे. नववर्षातील केवळ दोन दिवस वगळता उर्वरित पाच व्यवहार दिवसांत बाजारात मोठी विक्री झाली असून सेन्सेक्स तब्बल २२०० अंकांनी घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही बाजारातील घसरण थांबली नाही. शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ७३० अंकांची घसरण होऊन तो ८३,४७६ अंकांपर्यंत खाली आला होता. निफ्टी ५० देखील इंट्रा-डे व्यवहारात २५,६४८.४० अंकांपर्यंत घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही सुमारे एक टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. मागील पाच दिवसांत सेन्सेक्समध्ये सुमारे २.६ टक्के तर निफ्टीमध्ये २.५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
९ जानेवारी रोजी सेन्सेक्स ६०४ अंकांच्या घसरणीसह ८३,५७६.२४ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी १९३.५५ अंकांनी घसरत २५,६८३.३० अंकांवर स्थिरावला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गुरुवारीच सुमारे ८ लाख कोटी रुपयांचे भांडवल नष्ट झाल्याचा अंदाज आहे.
बाजारातील या पडझडीमागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेली विक्री हा प्रमुख घटक मानला जात आहे. जुलै २०२५ पासून सुरू असलेला विक्रीचा ट्रेंड नववर्षातही कायम असून जानेवारी २०२६ मध्ये ८ जानेवारीपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ८,००० कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
जागतिक पातळीवरील राजकीय अनिश्चितता आणि अमेरिकेशी संबंधित घडामोडींचाही भारतीय बाजारावर परिणाम होत आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्ट ९ जानेवारी रोजी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत निर्णय देणार आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्या विरोधात गेल्यास जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारालाही दिलासा मिळू शकतो. मात्र निर्णय त्यांच्या बाजूने गेल्यास बाजाराच्या भावनांवर मोठा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर अमेरिकन न्यायालयाचा निर्णय ट्रम्प यांच्या बाजूने लागला, तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो, त्यामुळे हा निर्णय भारतासाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो.
याशिवाय भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराबाबतही अनिश्चितता कायम आहे. काही दिवसांत करार होईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विशेषतः शेती आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याच्या अमेरिकेच्या मागणीवर भारताची सहमती नसल्याने चर्चेत अडथळे येत असल्याचे मानले जाते.
दरम्यान, देशातील आघाडीच्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सतर्क भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. टीसीएस आणि एचसीएलचे निकाल सोमवारी जाहीर होणार असून डीमार्ट रविवारी निकाल सादर करणार आहे. आयआरडीएकडूनही लवकरच निकाल जाहीर केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण अधिक गडद झाले आहे.
(टीप: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. या बातमीत दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून कोणतीही गुंतवणूक शिफारस किंवा सल्ला देण्याचा उद्देश नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
--------
