स्वतःला ‘अधिकाऱ्याची पत्नी’ असल्याचा दावा
नवी दिल्ली : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर एका महिलेनं स्वतःची हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःला सहायक जेल अधीक्षक आदित्य कुमार यांची पत्नी म्हणून ओळख देणाऱ्या या महिलेने तीन दिवस सलग न्याय मागत राहूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत ही टोकाची कृती केली. घटनेनंतर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
जखमी महिला अमृता कुमारी या दोन मुलांची आई असून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी सतत धावाधाव केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये मंदिरात विवाह झाल्यानंतर त्या आणि आदित्य कुमार पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. महिला सांगते की अधिकारी तिच्या दोन्ही मुलांबद्दल पूर्णपणे जाणून होते आणि मुलांना स्वतःची जबाबदारी म्हणून स्वीकारले होते. तथापि, अचानक त्याच अधिकाऱ्यांनी संबंध नाकारत तिला घराबाहेर काढल्याचा आरोप महिलेने केला आहे.
वारंवार तक्रार घेऊन कार्यालयात गेल्यानंतरही भेट न मिळाल्याने आज पुन्हा दोन्ही मुलांसह कार्यालयात पोहोचलेल्या महिलेने काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर संतापाच्या भरात ब्लेडने स्वतःचा हात शिरला. हा प्रकार पाहताच तेथील महिला पोलिसांनी तिला ताबडतोब रुग्णालयात हलवले.
या प्रकरणावर कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यापासून पोलिस अधिकारी सध्या दूर राहात आहेत. मात्र या धक्कादायक घटनेने सुरक्षा व्यवस्थेबरोबरच महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दरम्यान, महिलेने माध्यमांसमोर काही खासगी व्हिडिओ आणि पुरावे सादर करून आपली कहाणी मांडल्याचेही समजते. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.
बिहारच्या समस्तीपूरमधील दलसिंहसराय उप-कारागृहातील सहाय्यक तुरुंग अधीक्षक आदित्य कुमार यांच्यावर आरोप करत अमृता कुमारी हिने समस्तीपूर एसपी कार्यालयाच्या व्हरांड्यात मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
------------------------------------------------
