गुजरातच्या आंब्याला ‘हापूस’ मानांकनाची प्रक्रिया सुरू !

                                        कोकणात संतापाची लाट, न्यायालयीन लढाईचा इशारा 

रत्नागिरी : हापूस म्हटलं की कोकण आणि कोकण म्हटलं की हापूस अशी जगभरात घट्ट झालेली ओळख आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गुजरात राज्यातील वलसाड येथील आंब्याला ‘हापूस’ मानांकन मिळावे यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आल्यानंतर कोकणात संतापाची लाट उसळली असून, शेतकरी संघटनांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. 

कोकणातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन मिळाल्यास कोकणातील हापूसची पारंपरिक ओळख, बाजारातील अधिराज्य आणि आर्थिक व्यवहार यांना मोठा फटका बसेल. कोकणच्या हापूस नावाखाली अद्यापही देशभरात मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीत फसवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विविध प्रदेशातील आंबे बाजारात कोकण हापूस म्हणून विकले जातात आणि त्यामुळे खरी ओळख असलेल्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. 

याच कारणामुळे कोकणातून भौगोलिक मानांकनासाठी लढा उभारण्यात आला आणि 2018 मध्ये कोकणातील आंब्याला अधिकृतरित्या हापूस मानांकन मिळाले. यामुळे कोकणातील हापूसला वेगळी ओळख निर्माण झाली आणि जगभरात त्याची खास चव, सुवास आणि गुणवत्ता टिकली. परंतु या मानांकनानंतरही 2022 मध्ये नारायणगाव आणि 2023 मध्ये गुजरातच्या वलसाड येथील आंब्याला हापूस मानांकन देण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्याबाबतची सुनावणी सुरू झाल्यानंतर कोकणातील शेतकऱ्यांनी तिव्र प्रतिक्रिया दिली असून वलसाडच्या आंब्याला हापूस म्हणून मान्यता मिळाल्यास पुढे न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

कोकण हापूस उत्पादक व विक्रेते संघाचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी माध्यमांना सांगितले की, हापूस ही कोकणाची ओळख आहे आणि संपूर्ण प्रक्रिया, ऐतिहासिक माहिती आणि भौगोलिक पुरावे आधीच सादर केलेले आहेत. त्यामुळे ‘हापूस’ हा शब्द इतरांना वापरू देणे अन्यायकारक आणि कोकणाच्या अर्थचक्राला धक्का देणारे ठरेल.

कोकणातील हापूसचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. सुमारे 2.50 लाख मेट्रिक टन हापूस आंब्याचे वार्षिक उत्पादन आणि जवळपास 300 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या फळावर आधारित आहे. त्यापैकी सुमारे 25 हजार मेट्रिक टन हापूस परदेशात निर्यात केला जातो आणि त्यामुळे 300 ते 320 कोटी रुपयांचे परकीय चलन देशात येते. शेतकऱ्यांच्या मते, हापूसची ओळख कमी झाली किंवा बाजारातील भरोसा ढासळला तर या आर्थिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

कोकणातील हापूस केवळ शेती उत्पन्न नाही, तर कोकणच्या संस्कृतीची ओळख आणि अभिमानाचा विषय असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन देण्याचा प्रयत्न कोकणातील शेतकऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप केला जात आहे आणि यापुढे कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे देशातील कृषी आणि निर्यात बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.


------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने