सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी वनक्षेत्रात लांडग्यांच्या संशोधनादरम्यान दोन हजार वर्षांपूर्वीचा 15 घेरांचा विशाल दगडी चक्रव्यूह सापडला असून भारत–रोम व्यापाराचा हा दुर्मिळ पुरावा मानला जात आहे.
सोलापूर : महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी वनक्षेत्रातून समोर आलेल्या एका अनपेक्षित शोधामुळे देशातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहास अभ्यासकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. स्वयंसेवी संस्था नेचर कन्झर्वेशन सर्कलकडून या परिसरात लांडग्यांची संख्या किती आहे, याबाबत संशोधन सुरू असताना तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचा एक विशाल दगडी चक्रव्यूह आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा चक्रव्यूह आतापर्यंत भारतात सापडलेला सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
बोरामणीच्या गवताळ आणि अर्धशुष्क प्रदेशात तब्बल 15 वर्तुळांचा समावेश असलेली ही संरचना आढळून आली आहे. या चक्रव्यूहाची रचना अत्यंत नियोजनबद्ध असून त्यामधून बाहेर पडण्यासाठी विशिष्ट मार्ग देखील तयार करण्यात आलेला आहे. या चक्रव्यूहासाठी वापरण्यात आलेले दगड साधारणतः 1 ते 1.5 इंच उंचीचे असून अनेक छोट्या दगडी तुकड्यांपासून ही संरचना उभारण्यात आली आहे.
नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या संशोधन पथकातील सदस्य पप्पू जमादार, नितीन अनवेकर, धनंजय काकडे, भरत छेडा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत यांच्या लक्षात हा चक्रव्यूह आल्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ पुरातत्त्वशास्त्रज्ञ सचिन पाटील यांना दिली. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण शोध जगासमोर आला. विशेष म्हणजे या भागात पुरातत्त्व विभागाकडून कोणतेही अधिकृत उत्खनन सुरू नव्हते, त्यामुळे हा शोध पूर्णपणे योगायोगाने लागला आहे.
यानंतर डेक्कन कॉलेजच्या अभ्यासकांनी या चक्रव्यूहाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार भारतात यापूर्वी आढळलेले दगडी चक्रव्यूह हे मर्यादित घेरांचे होते, मात्र बोरामणी येथे सापडलेली ही संरचना तब्बल 15 घेरांची असून आकाराने अत्यंत विशाल आहे. इतिहासकारांच्या मते या चक्रव्यूहाची निर्मिती अंदाजे दोन हजार वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता आहे.
या चक्रव्यूहाची रचना प्राचीन रोम साम्राज्यातील नाण्यांवर आढळणाऱ्या चक्रव्यूह संरचनेशी साधर्म्य दर्शवते. त्यामुळे प्राचीन काळात भारत आणि रोम यांच्यातील व्यापारी व सांस्कृतिक संबंधांवर नव्याने प्रकाश पडला आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते हा शोध भारत–रोम व्यापाराचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा भौतिक पुरावा ठरू शकतो.
या चक्रव्यूहाचा पुढील अभ्यास सुरू असून, भविष्यात यासंदर्भात आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतिहासकारांच्या मते हा शोध म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासात एखादा मौल्यवान खजिनाच हाती लागल्यासारखा आहे.
____________________________________
