अमेरिकेतील कुख्यात लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित तथाकथित ‘एपस्टीन फाईल्स’ सार्वजनिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
वॉशिंग्टन: एपस्टीन फाईल्समुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे. या दस्तावेजांमुळे केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोप आणि आशियातही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र अद्याप सर्व कागदपत्रे, नावे आणि फोटो समोर न आल्याने अमेरिकेच्या न्याय विभागावर तीव्र टीका होत आहे.
या फाईल्समध्ये शेकडो तरुणींचे फोटो, ई-मेल्स, अश्लील संदेश, कोडवर्ड्स आणि कथित ‘रेटकार्ड’ असल्याचा उल्लेख केला जात आहे. काही जागतिक पातळीवरील प्रसिद्ध व्यक्ती तरुणींसोबत दिसत असल्याचे दावे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तथापि, या व्यक्तींचा प्रत्यक्ष लैंगिक शोषण किंवा देहव्यापाराशी थेट संबंध होता की नाही, याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष अद्याप जाहीर झालेला नाही.
माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, काही आंतरराष्ट्रीय नेते, उद्योगजगतातील नामवंत व्यक्ती यांची नावे चर्चेत येत असली, तरी अनेक फोटो आणि नावे अद्याप गोपनीय ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर न्याय विभागाने ‘अर्धसत्य’च समोर आणल्याचा आरोप नागरिक आणि विरोधकांकडून केला जात आहे.
दाव्यानुसार, 19 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन फाईल्स सार्वजनिक करण्यासंबंधी विधेयकावर स्वाक्षरी केली होती आणि त्यानंतर एका महिन्यात हे दस्तावेज जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते.
19 डिसेंबर 2025 रोजी काही कागदपत्रे सार्वजनिक झाल्याचा दावा असून, त्यानंतर अमेरिकेत राजकीय वादळ उठले आहे. तथाकथित ‘Epstein Files Transparency Act’ अंतर्गत हजारो पानांचे दस्तावेज, फोटो आणि संवाद सार्वजनिक झाल्याचे म्हटले जात आहे.
या फाईल्समध्ये रशिया, अमेरिका आणि युरोपमधील तरुणींचा उल्लेख असून, मसाजच्या नावाखाली देहव्यापारात ढकलल्याचे आरोप तपासात समोर आल्याचे दावे केले जात आहेत. अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे आरोपही या प्रकरणाशी जोडले जात आहेत. मात्र या सर्व बाबींवर अधिकृत तपास आणि न्यायालयीन निष्कर्ष अद्याप अपेक्षित आहेत.
दरम्यान, सिनेटमधील अल्पसंख्यांक नेते चक शूमर यांनी ट्रम्प प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशासनाने संपूर्ण सत्य बाहेर आणले नसून, जगासमोर केवळ अर्धवट माहिती ठेवली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. एपस्टीन हा प्रभावशाली वित्तीय सल्लागार होता आणि न्यूयॉर्कसह इतर शहरांमध्ये मोठ्या पार्टींचे आयोजन करत असे.
जिथे राजकारण, उद्योग आणि समाजातील नामवंत उपस्थित राहत असत, असा आरोपही करण्यात आला आहे.एपस्टीन फाईल्सचा संपूर्ण खुलासा न झाल्याने आता ट्रम्प प्रशासनाच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही रिपब्लिकन खासदारांनीही सर्व कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी केल्याने राष्ट्राध्यक्षांवर दबाव वाढल्याची चर्चा आहे.
या फाईल्समधील कथित 254 मसाज करणाऱ्या महिलांची नावे, फोटो आणि त्यांनी कोणासाठी काम केले याची माहिती सार्वजनिक का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकूणच, एपस्टीन प्रकरणाशी संबंधित फाईल्समुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, संपूर्ण सत्य कधी आणि कितपत समोर येते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
---------------------------------------------
