मुंबईतील ‘हा’टॉवर देशातील सर्वात महागडा निवासी प्रकल्प


मुंबईच्या वरळी सी-फेसवरील नमन झाना हा देशातील सर्वात महागडा निवासी प्रकल्प ठरला आहे. २०२५ मध्ये येथे ७०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे व्यवहार झाले असून अल्ट्रा-रिच वर्ग या टॉवरकडे का आकर्षित होतो, यामागची कारणे समोर आली आहेत.

मुंबई: मुंबईच्या वरळी  सी-फेसवर उभा असलेला ‘नमन झाना’ टॉवर २०२५ मध्ये भारताच्या रिअल इस्टेट आणि कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. देशातील अल्ट्रा-रिच वर्ग एका अपार्टमेंटसाठी ५०० ते ७०० कोटी रुपये मोजण्यास तयार असल्याने हा टॉवर देशातील सर्वात महागडा निवासी प्रकल्प म्हणून पुढे आला आहे. 

आलिशान इमारतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही नमन झानाने लक्झरीचे सर्व जुने विक्रम मोडले आहेत.

वरळी सी-फेस ही जागा नेहमीच श्रीमंतांची पहिली पसंती राहिली आहे. मात्र २०२५ मध्ये नमन झानाने देशातील सर्वात महागड्या रेसिडेन्शियल डील्स साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे १५० मीटर उंच आणि ४४ मजली असलेला हा टॉवर नमन ग्रुपने विकसित केला असून, त्याची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद फर्म तलाती अँड पार्टनर्स यांनी केली आहे. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निवासी व्यवहारांचा हा टॉवर साक्षीदार ठरला आहे.

या टॉवरची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची अत्याधुनिक रचना. घराच्या आत एकही खांब नसल्यामुळे खरेदीदारांना आपल्या पसंतीनुसार ६,५०० चौरस फूटांपासून ते तब्बल २२,००० चौरस फूटांपर्यंतचा मोकळा स्पेस डिझाइन करता येतो. संपूर्ण प्रकल्पात केवळ २२ निवडक रहिवासी असून, प्रत्येक मजल्यावर मोजकीच घरे ठेवण्यात आली आहेत, ज्यामुळे उच्च दर्जाची गोपनीयता राखली जाते.

नमन झानामधील प्रत्येक अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचा १८० अंशांचा अप्रतिम नजारा दिसतो. मोठ्या काचांच्या खिडक्या आणि बाल्कनी अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आल्या आहेत की, समुद्रात तरंगत असल्याचा अनुभव रहिवाशांना मिळतो. टॉवरमध्ये ११ मजल्यांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असून, जिम, पिलाटेस रूम, इंडोअर गेम्स एरिया आणि भव्य पार्टी हॉलसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आरसीसी आणि स्टीलच्या हायब्रिड संरचनेमुळे हा टॉवर केवळ भक्कमच नाही, तर काचेसारखा आधुनिक लूक देणारा ठरतो.

२०२५ मध्ये येथे झालेल्या व्यवहारांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गजांनाही चकित केले. या टॉवरमध्ये २०० कोटींपासून ७०० कोटी रुपयांपर्यंतच्या डील्स नोंदवण्यात आल्या आहेत. यूएसव्ही फार्माच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी निवासी डील करत ३२व्या ते ३५व्या मजल्यादरम्यान दोन डुप्लेक्स अपार्टमेंट्स खरेदी केली. २२,५७२ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या घराची किंमत ६३९ कोटी रुपये असून, जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटीसह एकूण खर्च सुमारे ७०३ कोटी रुपये झाला आहे. प्रति चौरस फूट सुमारे २.८३ लाख रुपये इतका हा दर भारतातील सर्वोच्च मानला जात आहे.

गोदरेज इंडस्ट्रीजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तान्या दुबाश यांनी ‘शौला रिअल इस्टेट्स’मार्फत याच टॉवरमध्ये २२५.७६ कोटी रुपयांचे सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. सुमारे ११,४८५ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या व्यवहारात सहा कार पार्किंगची सुविधाही समाविष्ट आहे. याशिवाय सन फार्माचे प्रवर्तक दिलीप सांघवी यांच्या पत्नी विभावरी सांघवी यांनीही २१व्या आणि २९व्या मजल्यावरील दोन अपार्टमेंट्स सुमारे १३५ कोटी रुपयांना खरेदी केली आहेत.

नमन झाना आता केवळ एक इमारत न राहता एक स्टेटस सिम्बॉल बनला आहे. मर्यादित इन्व्हेंटरी, वरळी सी-फेससारखी प्राइम लोकेशन आणि अत्युच्च गोपनीयता यामुळे हा प्रकल्प इतर सर्व लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सपेक्षा वेगळा ठरतो. २०२५ मधील या ऐतिहासिक डील्समधून हे स्पष्ट झाले आहे की, भारतातील अब्जाधीश आता केवळ लक्झरी नव्हे, तर अल्ट्रा-एक्सक्लूसिविटीचा शोध घेत आहेत, जिथे शेजारीही त्यांच्याच तोलामोलाचे असतात.

_______



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने