भाजपचे शतक, शिंदे सेनेचे अर्धशतक, अजित पवारांची ताकद, महाविकास आघाडीत काँग्रेस आघाडीवर
महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर; भाजपचे 120 नगराध्यक्ष, शिंदे सेनेचे 54, अजित पवार गटाची ताकद, मविआत काँग्रेस आघाडीवर.
मुंबई: महाराष्ट्रातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आणत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं अर्धशतक पूर्ण केलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रभावी कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक यशस्वी ठरला आहे.
राज्यात सध्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. त्याचा थेट फायदा भाजपला मिळाल्याचं निकालांतून स्पष्ट झालं आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत भाजपचे तब्बल 120 नगराध्यक्ष निवडून आले असून ही आतापर्यंतची भाजपची राज्यातील सर्वोत्तम नगरपालिका कामगिरी मानली जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात भाजपने चांगली पकड निर्माण केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनंही या निवडणुकीत प्रभावी कामगिरी केली आहे. शिंदे गटाचे 54 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडून आले आहेत. सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं भाजप आणि शेकापच्या पॅनलचा पराभव केला. कोकण पट्ट्यात मंत्री भरत गोगावले आणि निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठं यश मिळालं असून या भागात शिंदे गटाचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सहा, नाशिक जिल्ह्यात अकरापैकी पाच, तर पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू येथेही शिंदे गटाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने 40 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. पुणे जिल्ह्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा आपला प्रभाव सिद्ध केला असून 17 पैकी 10 ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी, तसेच कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक मोठा ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 34 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची कामगिरी लक्षवेधी ठरली असून अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सात नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. उरुण ईश्वरपूर, आष्टा आणि रायगडमधील उरण येथे पक्षाला यश मिळालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठ नगराध्यक्ष विजयी झाले असून कुर्डूवाडी, श्रीवर्धन यासह काही ठिकाणी ठाकरे गटाने आपली उपस्थिती नोंदवली आहे. वंचित बहुजन आघाडीने बार्शी टाकळी आणि चांदूर रेल्वे येथे नगराध्यक्ष निवडून आणले असून स्थानिक आघाड्यांनी 23 ठिकाणी यश मिळवलं आहे.
एकूणच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय समीकरणांवर सत्ताधारी महायुतीचं वर्चस्व स्पष्ट केलं असून आगामी राजकारणासाठी हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.
-----
