भाजप पुन्हा नंबर वन, महायुतीला ऐतिहासिक यश!

 

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले जनतेचे आभार

 नगरपालिका - नगरपंचायत निवडणूक 2025 निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; भाजप नंबर वन, महायुतीला ऐतिहासिक यश मिळाल्याबद्दल जनतेचे आभार.

मुंबई: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. या निकालांत भाजप पुन्हा एकदा राज्यात नंबर वन ठरल्याचं स्पष्ट झालं असून हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा  विश्वास दाखवला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केलं आहे. 

सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना त्यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे आकडे मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, 2017 साली भाजपाने 94 नगरपालिकांवर विजय मिळवला होता, तर यंदा दुपारी 3 वाजेपर्यंत आलेल्या कल आणि निकालांनुसार भाजपाने 129 नगरपालिकांवर, म्हणजेच सुमारे 45 टक्के ठिकाणी यश मिळवलं आहे. महायुती म्हणून एकूण 288 पैकी तब्बल 215 नगरपालिका, म्हणजेच 74.65 टक्के नगरपालिका जिंकण्यात आल्या आहेत.

नगरसेवकांच्या जागांचा विचार केला असता भाजपाची कामगिरी आणखी ठळकपणे समोर येते. 2017 मध्ये भाजपाला 1602 जागा मिळाल्या होत्या, त्या यंदा वाढून 3325 जागांवर पोहोचल्या असून हे प्रमाण 47.82 टक्के इतकं आहे. म्हणजेच मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने दुपटीहून अधिक जागा जिंकल्या आहेत. 

महायुती म्हणून एकूण 6952 पैकी 4331 जागा, म्हणजेच 62.30 टक्के जागांवर विजय मिळवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही निवडणूक महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील पहिली निवडणूक असल्याचं नमूद करत त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. तसेच या निवडणुकीसाठी परिश्रम घेणारे सर्व सहकारी नेते आणि कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक केलं.

भविष्यातील राजकारणाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालांना आगामी महानगरपालिका निवडणुकांचा ट्रेलर असल्याचं म्हटलं. याहूनही मोठं यश संपादन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावं, असं आवाहन करत त्यांनी विकासाचा प्रवास अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

------- 


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने