भाजपच्या एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांचा पराभव!

 मोठी उलथापालथ, मतदारांनी घराणेशाहीला दिला ठेंगा

नांदेडच्या लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांचा पराभव झाला असून मतदारांनी घराणेशाहीला ठाम नकार दिला आहे.

नांदेड : जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला असून भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातील सहा जणांना दिलेल्या उमेदवारीला मतदारांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत झालेल्या या निवडणुकीत घराणेशाहीविरोधात मतदारांनी ठाम भूमिका घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. याशिवाय नगरसेवक पदासाठी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना तिकीट देण्यात आलं होतं. एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली होती.

भाजपकडून सातत्याने काँग्रेससह इतर पक्षांवर घराणेशाहीचे आरोप केले जात असताना, लोह्यातील ही उमेदवारी भाजपसाठीच अडचणीची ठरली. अखेर मतदानातून जनतेने आपला कौल स्पष्ट करत या सहाही उमेदवारांचा पराभव केला. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत भाजपचा डाव उधळून लावला आहे.

लोहा नगर परिषद ही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला मानली जाते. आतापर्यंत या भागात त्यांचे राजकीय वर्चस्व राहिले असून यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी अजित पवार गटाने ताकद दाखवून दिली आहे. दहा प्रभाग आणि २० नगरसेवक असलेल्या या नगर परिषदेसाठी सर्व प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी केली होती. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांच्यासह अनेक उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली होती.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढल्याचा दावा केला जात होता. मात्र, लोहा नगर परिषदेत एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांना संधी दिल्याने भाजप अडचणीत सापडला. इच्छुकांची संख्या अधिक असताना असा निर्णय का घेण्यात आला, यावरही प्रश्न उपस्थित झाले होते.

अखेर, या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपला मोठी नामुष्की पत्करावी लागली असून अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावरही राजकीय टीका होत आहे. लोहा नगर परिषद निवडणूक निकालाने घराणेशाहीला नकार देत मतदारांनी स्थानिक राजकारणात नवा संदेश दिल्याचं स्पष्ट झालं आहे.



-------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने